अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा कलावंत ही आजकाल दुर्मीळ झालेली प्रजाती. सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले! विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रम गोखले यांच्या घराण्यात चार पिढय़ांत हे कलावंतपण मुरलेले आहे. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटातील पहिल्या स्त्री-कलावंत; तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या बालकलाकार. वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक नाणावलेले अभिनेते. पण त्यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवलेनाहीत. दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. अशा एका जातिवंत कलावंताचा सन्मान आता, आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने होत आहे.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on vikram gokhale