वैचारिक शिस्तीच्या अभावामुळे आणि घट्ट रुजलेल्या गरसमजामुळे होणारी गल्लत, दुराग्रहामुळे किंवा प्रेरणादायक अतिशयोक्तीच्या भरात किंवा मुद्दाम दिशाभूल करण्यासाठी प्रश्नाचे चुकीचे निदान करण्याची गफलत आणि बहुतेकदा यामुळेच प्रमाणाबाहेर व विघातकरीत्या उसळणारा गहजब यांची चिकित्सा दर शुक्रवारी करणारे नवे सदर..
‘देवराई’ हा स्किझोफ्रेनिया या आजाराचे स्वरूप स्पष्ट करणारा आणि रुग्णाला व संबंधितांना कोणत्या ताणांमधून जावे लागते यावरील चांगला सिनेमा होता. त्याला पारितोषिक मात्र ‘पर्यावरण समस्येवरील उत्कृष्ट चित्रपट’ असे मिळाले. मुख्य भूमिका करणारे अतुल कुलकर्णी यांनी यावर खंतही व्यक्त केली होती. असाध्य रोगाशी हसतमुखाने दिलेली झुंज चित्रित करणारी ‘हसरी किडनी’ ही कादंबरी एका विद्यापीठाने स्त्रीवादी साहित्य म्हणून नेमली होती! म्हणजे जर ती िहदी असती तर ‘हसता हुआ गुडदा’ हे पुिल्लगी झाल्याने हा प्रसंग टळला असता. ‘आँधी’ हा सिनेमा ‘राजकीय’ म्हणून गणला गेला. कथानक कौटुंबिकच होते, ‘करिअरबाज पत्नी’त दडपलेली प्रेमिका, हा विषय होता. निवडणूक हा बॅकड्रॉप होता. ‘लेडीज हॉस्टेल’ नावाचे नाटक फक्त नाव वाचून व नाटक न वाचताच बंद पाडले गेले. या कृत्यात मठ्ठ संस्कृतिरक्षकांसोबत स्त्रीवाद्यांनीही भाग घेतला होता! ‘रतिसुखातील फोलपणा ओळखा, आत्मानंदाचा शोध घ्या’ हा संदेश देणाऱ्या पुस्तकाच्या भाषांतरकाराने शीर्षकात ‘संभोगातून समाधी’ असा मूळ शीर्षकात नसलेला ‘तून’ घातला. पुस्तकात ‘तून’ नाहीये. ‘च्याकडून च्याकडे’च आहे. पण ‘तून’ला बिचकून अनेकांनी ओशोंना कायमचे बाद ठरविले.
म्हणजेच नावात, तसेच शब्दातही बरेच काही असते. जेल आणि प्रिझन हे शब्द समानार्थी असताना जेलर आणि प्रिझनर हे मात्र विरुद्ध अर्थी बनतात. अशा खूपच धमाली सांगता येतील. इथे मुद्दा हा की, वैचारिक बेशिस्तीची सुरुवात शाब्दिक बेशिस्तीपासून होत असते. सेंद्रिय हे ऑर्गॅनिकचे भयंकर भाषांतर अजूनही चलनात आहे. ऑर्गॅनिक हा ऑर्गन म्हणजे इंद्रियपासून आलेला नसून ऑर्गॅनिझम म्हणजे जीवपासून आलेला आहे. त्यामुळे ‘जैव’ हेच योग्य आहे.
काही अपसंज्ञा (मिसनॉमर्स) दिशाभूल करणाऱ्या ठरतात.
अ-दखलपात्र गुन्हे हे दुर्लक्षणीय नसतात, तर त्यांना फिर्यादी पक्ष लागतो. उलट शासनाने ज्या गुन्ह्यांवर स्वत: होऊन हस्तक्षेप करायचा असतो व स्वत: पक्षकार बनायचे असते ते ‘दखलपात्र’ गुन्हे असतात. ‘नैसíगक न्यायाची तत्त्वे’ असा एक शब्द रूढ आहे. पण येथे ‘नॅचरल’चे भाषांतर ‘स्वाभाविक’ हे असायला हवे. न्याय या कल्पनेत अंगभूतपणे काय अभिप्रेत आहे? याचा विचार करता कोणालाही पटतील अशी ती ‘न्यायाची स्वाभाविक तत्त्वे’ असतात. दोन्ही पक्षांना संधी, न्यायाधीश कोणत्याच पक्षकाराशी संबंधित नसावा वगरे. निसर्गात न्याय-अन्याय असा काहीच नसतो. उत्क्रांती तत्त्वाबाबतही ‘बळी तो कान पिळी’ हा धडधडीत चुकीचा अर्थ लावला गेला आहे. ‘तेथ लव्हाळी वाचती’ अर्थात अनुकूलन असा तो आहे.
आधुनिक औषधोपचारशास्त्राला ‘अॅलोपॅथी’ म्हणणे चूक आहे. अपायसदृश उपाय म्हणजे होमिओपॅथी आणि त्याच्या उलट ती ‘अॅलोपॅथी’ ही दोन्ही म्हणणी अतीच बाळबोध आहेत. तसेच अगदी ‘सिद्ध’ अशा आयुर्वेदिक औषधी वस्तूमध्ये (आख्खी वस्तू घातल्याने) अनेक अवांतर रेणूही आढळतात व कार्यकारी रेणू नेमका वेगळा काढता आलेला नसतो. होमिओपॅथीत तर अल्कोहोल आणि साखर या माध्यमांवर ‘डोक्याच्या संदेशाचे गूढ सॉफ्टवेअर’ स्वार झालेले असते. मूळ वस्तूचा रेणू सापडणे फारच दुरापास्त असते. शंभराचा दोनशेवा घात इतके पट डायल्यूट केल्यावर (समजा मधमाशीच्या विषातला) कोणता रेणू कुठल्या गोळीच्या वाटय़ाला येणार? याउलट आधुनिक औषधशास्त्रात नेमका कार्यकारी रेणू माहीत असतो. त्याचा रासायनिक नकाशा माहीत असतो. तसेच भरपूर, काटेकोर आणि निरंतर आव्हानीत होणाऱ्या चाचण्या ही आधुनिक औषधशास्त्राची मानके असतात. कोणत्यातरी काळी होऊन गेलेल्या घराण्याचे अॅलोपॅथी हे नाव देऊन, आपण आधुनिक औषधशास्त्राची अवगणना करत असतो.
अपसमज : धडधडीत आणि निसटणारे
टॉन्सिल्स काढल्याने उंची वाढते, धरणाच्या पाण्यातून ‘शक्ती’ काढून घेतलेली असते, ध्रुवाकडून ‘निघालेल्या’ विकर्ष रेषा थेट कवटीवर आपटू नयेत म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये’, ‘पवनचक्क्या बसवल्याने पाऊस कमी होतो..’ या प्रकारचे अपसमज धडधडीत असल्याने ते बहुतेकांचे दूर झालेले असतात. काही अपसमज तर पाठय़पुस्तकातही टिकून राहिल्याने अधिकृत बनून बसतात.
‘न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला’, हे चक्क खोटे आहे. अॅरिस्टॉटलचे गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत गॅलिलिओने प्रयोगांनी खोडले व नंतर न्यूटन झाला. पृथ्वीलाच हा गुण असतो किंवा ‘लघू’ वस्तूला ‘गुरू’ वस्तूच खेचते हेही खरे नव्हते. कोणत्याही दोन वस्तू एकमेकींना खेचत असतात ही दृष्टी आणि त्या किती बलाने खेचतात याचे गणिती सूत्र न्यूटनला सापडले. नुसते गुरुत्वाकर्षण हे प्राचीन भारतीय ज्ञानातही होतेच.
पृथ्वी हा एक जीव आहे असा ‘गय्या सिद्धान्त’ हा (मनुष्य वगळून) निसर्गावर प्रेम करणाऱ्यांना भावतो. अजीव ते जीव या संक्रमणासाठी स्वत:ची प्रतिकृती काढणारे रेणू ही किमान अट असते. हे रेणू भोवतालातून स्वत:वर जागोजागी फिट्ट बसणारे छोटे रेणू चिकटवून घेत अंगावरच प्रतिकृती बनवतात आणि दुभंगल्यावर तंतोतंत मूळच्या प्रमाणे दोन रेणू बनतात. जणू भक्षण आणि पुनरुत्पादनाची ही आदिम चाहूल असते. आता ही करामत पृथ्वीबाबत कशी काय कल्पिता येईल?
सध्या आपण सारेच शिक्षा तीव्र करा या मूडमध्ये आहोत. पण न्याय म्हणजे सूड नव्हे. जर आपण चुकून जरी सूडात्मक न्याय-कल्पना मान्य केली तर आपण िहस्र अराजकात आणि क्रूर हुकूमशाहीत अडकू. प्रतिबंधात्मक (डिटरंट) अर्थाने, शिक्षेची तीव्रता वाढल्याने गुन्हे कमी होतात हे वारंवार खोटे पडत आलेले आहे. शिक्षा सौम्य पण संशयाचा फायदा न मिळू देणारा चोख तपास असल्यास गुन्हे कमी होतात. कारण गुन्ह्याचा मोह झालेला माणूस जर ‘सापडणार नाही आणि सिद्ध होणार नाही’ ही खात्री असेल तर शिक्षा झाल्याचे भय-स्वप्न- ‘रंजन’ करीतच नाही. उलट शिक्षा जितकी तीव्र तितका तो गुन्हा ‘फुल-टू’ तयारीनिशी केला जातो! क्वचित पिसाट गुन्हेगार बेसावध सापडतातही, पण त्यांना तीव्र शिक्षा दिली की जणू आपण प्रतिबंधक न्यायाची व्यवस्था चोख बनविली हे खरे नसते..
लेखमालेची एकूण दिशा
शीर्षकातील ‘गल्लत’ हा शब्द वैचारिक शिस्तीच्या अभावामुळे आणि घट्ट रुजलेल्या गरसमजामुळे होणाऱ्या वैचारिक गोंधळासाठी योजला आहे. दुराग्रहामुळे किंवा प्रेरणादायक अतिशयोक्तीच्या भरात किंवा मुद्दाम दिशाभूल करण्यासाठी प्रश्नाचे जे चुकीचे निदान केले जाते त्यासाठी ‘गफलत’ हा शब्द योजला आहे. प्रमाणाबाहेर व विघातकरीत्या जो क्षोभ उसळतो किंवा जो अप्रस्तुत गाजावाजा होतो त्यासाठी ‘गहजब’ हा शब्द योजला आहे. अर्थात या तिन्ही गोष्टी एकमेकींपासून कप्पेबंदरीत्या विलग नसतात. त्या एकमेकीत काहीशा मिसळलेल्या असतात हेही ध्यानात ठेवले पाहिजे. काही लेखांकांत प्रकरणे वा प्रश्न घेऊन भाष्य असेल तर काही लेखांकांत वैचारिक स्पष्टता कमावण्याच्या मार्गाची चर्चा विविध उदाहरणांनी केली जाईल.
लोकशाहीला अधिक जिवंत व अर्थपूर्ण बनविण्यात जनआंदोलने हा महत्त्वाचा घटक असतो/असायला हवा. पण ही जनआंदोलने, कधी ‘न-प्रश्नां’ना प्रश्न बनवून भरकटतात, कोणत्या तरी अस्मिताबाजीत अडकतात. तसेच कधी खऱ्या प्रश्नावरील आंदोलनेसुद्धा निव्वळ नकारात्मक, अशक्य मागण्या करणारी आणि कोणताच विधायक-व्यवहार्य पर्याय न देणारी बनतात. असे होण्याने समस्याग्रस्त लोकांची अधिकच दुर्दशा होते; नागरिकांच्या राजकीय ऊर्जेचा अपव्यय होतो. इतकेच नव्हे तर लोकशाहीच्याच मुळावर घाव घालणारे अराजकही सुरू होऊ शकते. सुटू शकणाऱ्या प्रश्नांच्याही निरगाठी बनून बसतात. नव्या/ जुन्या धोरणांचा धिक्कार किंवा पुरस्कार करताना त्या धोरणांचे मूल्यमापन न करता धोरण ‘कोणी’ मांडले याच्यातच गुंतून पडले जाते. विरोधासाठी विरोध केला जातो वा पाठिंब्यासाठी पाठिंबा दिला जातो. ही लेखमाला वैचारिक गोंधळ दूर करणे, गरसमजांचे निराकरण करणे, विरोधांना व पािठब्यांना अर्थगर्भ बनविणे आणि विधायक पर्याय सुचविणे अशा स्वरूपाची असणार आहे.
६ लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल : rajeevsane@gmail.com
‘शनिवारचे संपादकीय’ पानावर उद्या व दर आठवडय़ाला, इंग्रजी पुस्तकांविषयीचे विविधांगी लेख
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2013 रोजी प्रकाशित
गल्लत, गफलत, गहजब! : नावात काय आहे?
वैचारिक शिस्तीच्या अभावामुळे आणि घट्ट रुजलेल्या गरसमजामुळे होणारी गल्लत, दुराग्रहामुळे किंवा प्रेरणादायक अतिशयोक्तीच्या भरात किंवा मुद्दाम दिशाभूल करण्यासाठी प्रश्नाचे चुकीचे निदान करण्याची गफलत आणि बहुतेकदा यामुळेच प्रमाणाबाहेर व विघातकरीत्या उसळणारा गहजब यांची चिकित्सा दर शुक्रवारी करणारे नवे सदर..
First published on: 04-01-2013 at 02:59 IST
मराठीतील सर्व गल्लत , गफलत , गहजब ! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is in the name