नेदरलँड्सच्य मार्सवन कंपनीने मंगळावर वसाहत करण्यासाठी काही माणसे पाठवण्याचे मनसुबे रचले असले तरी मंगळावरची धूळ विषारी असून तिथे वस्ती करणे शक्य नाही असा निर्वाळा वैज्ञानिकांनी दिला आहे.  ह्य़मून्स २ मार्स समिट या वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी असे मत व्यक्त केले की, मंगळावरची धूळ फारच विषारी असून ती मानवी आरोग्यास धोकादायक आहे. फिजिक्स ओआरजी या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तज्ज्ञांच्या मते मंगळावरील धूळ ही घातक असून ती मानवी वस्ती उभारण्यात प्रमुख अडथळा आहे.
मार्स वन या डच कंपनीने मंगळावर जाण्यासाठी तिकिटे विकणे चालू केले आहे. यात काही व्यक्तींना मंगळावर नेऊन सोडले जाणार असून परत आणले जाणार नाही. आतापर्यंत ७८००० लोकांनी मंगळावर जाण्याची तयारी दर्शवली आहे. नासाचे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी रिचर्ड विल्यम्स यांनी सांगितले की, मंगळाच्या पृष्ठभागावर पेरक्लोरेट ही रसायने आहेत. पेरक्लोरिक अ‍ॅसिडपासून ते तयार होते. त्यामुळे पृथ्वीवरून तिकडे जाणाऱ्यांना थायरॉइडचे विकार होऊ शकतात. पॅरागॉन स्पेस डेव्हलपमेंट या संस्थेचे सहसंस्थापक ग्रँट अँडरसन यांनी सांगितले की, तेथील धुळीत असलेला जिप्सम हा सुद्धा घातक घटक आहे. नासाच्या मार्स क्युरिऑसिटी रोव्हरने केलेल्या पाहणीत मंगळावर जिप्सम असल्याचे दिसून आले आहे. कोळसा खाणीत काम करणाऱ्यांचे फुफ्फुस कसे काळे होते तसेच मंगळावरही घडू शकते. मंगळावर सिलीकेट्स असल्याने ते श्वासात गेल्यास त्याची फुफ्फुसातील पाण्याशी अभिक्रिया होऊन आणखी हानिकारक रसायने शरीरात बनतात.