Zomato Layoff: मोठ्या संख्येने कर्मचारी कपात करणाऱ्या ट्विटर, मेटा, अॅमेझॉन कंपन्याच्या यादीत आता फूड एग्रीगेटर झोमॅटो कंपनीची ही भर पडली आहे. कंपनी आपल्या ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे, अशी माहिती झोमॅटोने दिली आहे. सध्याच्या मंदीच्या वातावरणात, कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी आणि तिचा खर्च कमी करण्यासाठी ही कर्मचारी कपात केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम?

झोमॅटोने जवळपास १०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्मचारी कंपनीच्या उत्पादन, टेक, कॅटलॉग आणि मार्केटिंग अशा विविध विभागांशी संबंधित आहेत. कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे ३ टक्के कामगारांना कामावरून काढून टाकायचे आहे. कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेच्या आधारावर झोमॅटो कंपनी ही कपात करणार असून ही नियमित प्रक्रिया आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. या कंपनीमध्ये सध्या ३ हजार ८०० कर्मचारी आहेत. याआधी मे २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे व्यवसायावर परिणाम झाल्याने कंपनीने साधारण १३ टक्के म्हणजे ५२० कर्मचाऱ्यांची कपात केली होती.

(आणखी वाचा : ट्विटरमधून काढूल टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार ‘ही’ कंपनी, भारतात ट्विटरला देतंय टक्कर )

कंपनीने आधीच दिली होती सूचना

झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल यांनी काही दिवसांपूर्वी एक टाउनहॉल आयोजित केला होता जिथे त्यांनी सूचित केले होते की, कंपनीचे कार्य किंवा विभाग जे चांगले कार्य करत नाहीत त्यांची कपात केली जाऊ शकते. याशिवाय क्लाउड किचनसाठी काम करणाऱ्या काही व्यवस्थापकांची यापूर्वीच बदली करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात कंपनीच्या तीन प्रमुख अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. झोमॅटोचे सह संस्थापक मोहित गुप्ता यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर नवापक्रम विभाग प्रमुख गंजू आणि सिद्धार्थ झेवर यांनी या महिन्याच्या सुरूवातीला राजीनामा दिला होता. यावेळी झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी एक बैठक घेऊन चांगली कामगिरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा इशारा दिला होता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After twitter meta amazon now zomato will also cut staff pdb