अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक कारणांमुळे चर्चेत आले होते. मनमानी कारभारामुळे त्यांच्यावर अनेकवेळा टीका झाली आहे. जागातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी ट्विटरसोबत झालेला त्यांचा वाद सर्वश्रुत आहे. ट्विटरने ट्रम्प यांचे खाते बंद केले होते. त्यांच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता ट्रुथ अ‍ॅपमुळे सोशल मीडियावर त्यांची उपस्थिती कायम राहणार आहे. गुगलने ट्रम्प यांचे सोशल मीडिया अ‍ॅप ट्रुथ याचा प्लेस्टोअरमध्ये समावेश करण्याची परवानगी दिली आहे. प्लेस्टोरच्या माध्यमातून हे अ‍ॅप लोकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपद्वारे निर्मित या ट्रुथ अ‍ॅपवर यापूर्वी सप्टेंबर महिन्यात गुगलने प्रतिबंध घातले होते. ट्रुध सोशल अ‍ॅपला अमेरिकेत फेब्रुवारी महिन्यात अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर लाँच करण्यात आले होते. आता ते गुगलवर देखील उपलब्ध होणार आहे. गुगलने ट्रुथ अ‍ॅप प्लेस्टोअरच्या माध्यमातून युजरना देण्याची परवानगी दिली असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले.

यामुळे अ‍ॅपला प्लेस्टोअरमध्ये घेतले नाही

ट्रुथ अ‍ॅप गुगलच्या प्ले पॉलिसीचे उल्लंघन करत होते, तसेच प्लाटफॉर्मवर ऑफर करण्यात येणाऱ्या युजर जनरेटेड सामग्रीला नियंत्रित करण्यासाठी प्रभावी प्रणाली नव्हती, अशी माहिती गुगलच्या एका प्रवक्त्याने दिली होती. हिंसा भडकवणाऱ्या सामग्रीबाबत धोरणांच्या उल्लंघणाविषयी गुगलने ट्रुथ अ‍ॅपच्या निर्मात्यांकडे चिंता व्यक्त केली होती.

म्हणून प्लेस्टोअर महत्वाचे

ट्रुथ अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी गुगल आणि अ‍ॅपल स्टोअर शिवाय इतर सोपा पर्याय युजरसाठी उपलब्ध नाही. युनायटेड स्टेट्समधील अँड्रॉइड स्मार्टफोन युजरना गुगल प्ले स्टोअर हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रमुख स्रोत आहे. या व्यतिरिक्त त्यांना डाऊनलोडिंगसाठी इतर संकेतस्थळे आणि स्टोअर पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. पण त्यांना सुरक्षा परवानगी लागते. गुगलने ट्रुथ अ‍ॅपला प्लेस्टोअरमध्ये प्रतिबंध घातल्यानंतर याच माध्यमातून ते युजरसाठी उपलब्ध होते. यूएसमधील ४० टक्के लोकांजवळ अँड्रॉइड फोन आहे. त्यामुळे ट्रुथ अ‍ॅपसाठी प्लेस्टोअर किती महत्वाचे आहे, हे यातून दिसून येते.

काय आहे ट्रुथ सोशल अ‍ॅप?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विटरला आव्हान म्हणून ट्रुथ सोशल अ‍ॅपची सुरुवात केली होती. जानेवारी २०२१ मध्ये ट्रम्प यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले होते. त्यांच्यावर लोकांना हिंसेसाठी भडविल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर ट्रुथ सोशल उपलब्ध करण्यात आले. हे अ‍ॅप ट्विटर सारखे अनुभव आणि मुक्त संवादाला प्रोत्साहन देईल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google gave permission to trump truth app to download from play store ssb