शेखर पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजच्या बरोबर ५० वर्षांपूर्वी पहिला मोबाईल कॉल करण्यात आला. म्हणजेच आज मोबाईलचा पन्नासावा वाढदिवस ! गेल्या अर्धशतकाच्या कालावधीत या उपकरणाची झालेली उत्क्रांती आणि याचा वापर हा मानवी इतिहासातील एक महत्वाचा अध्याय म्हणून गणला जाणार आहे. आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या व अवघ्या जगाला एका कनेक्टेड नेटवर्कमध्ये परिवर्तीत केलेल्या मोबाईल फोनच्या विकासाबाबत आज दोन शब्द !

मोटारोला कंपनीत कार्यरत असणारे अभियंता मार्टीन कुपर यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी स्वत:च्या नेतृत्वाखाली विकसित केलेल्या मोबाईल फोनवरून जगातील पहिला मोबाईल कॉल केला. याचमुळे मार्टीन कुपर हे ‘मोबाईलचे जनक’ म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. १८७६ साली अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी आपण तयार केलेल्या उपकरणातून पहिला टेलीफोन कॉल केला. यामुळे अर्थातच टेलीफोन हे उपकरण जगभरात पोहचले. मानवाच्या हातात संपर्कासाठी एक उपयुक्त उपकरण आले. यानंतर अद्ययावत संपर्क यंत्रणा म्हणून टेलीफोनचे वर्चस्व प्रस्थापित झाले. मात्र टेलीफोन नंतर काय ? याबाबत संशोधकांमध्ये मंथन सुरू झाले.

मोटारोला कंपनीत कार्यरत असणारे अभियंता मार्टीन कुपर यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी स्वत:च्या नेतृत्वाखाली विकसित केलेल्या मोबाईल फोनवरून जगातील पहिला मोबाईल कॉल केला. याचमुळे मार्टीन कुपर हे ‘मोबाईलचे जनक’ म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. १८७६ साली अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी आपण तयार केलेल्या उपकरणातून पहिला टेलीफोन कॉल केला. यामुळे अर्थातच टेलीफोन हे उपकरण जगभरात पोहचले. मानवाच्या हातात संपर्कासाठी एक उपयुक्त उपकरण आले. यानंतर अद्ययावत संपर्क यंत्रणा म्हणून टेलीफोनचे वर्चस्व प्रस्थापित झाले. मात्र टेलीफोन नंतर काय ? याबाबत संशोधकांमध्ये मंथन सुरू झाले.

पहा : First Call at 50

Video Credit – Motorola/Youtube

खरं तर, दुसर्‍या महायुध्दानंतर कुणीही व्यक्ती अगदी कुठूनही कॉल करू शकेल असे उपकरण विकसित करण्यासाठी बर्‍याच कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. यात अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी स्थापन केलेल्या बेल लॅबोरेटरीजचे अथक प्रयत्न सुरू होते. यात त्यांना थोडे यशदेखील लाभले. त्यांनी कार फोनची निर्मिती केली. तथापि, हे मॉडेल अतिशय महागडे आणि अर्थातच अव्यवहार्य असल्याने ते प्रचलीत झाले नाही. यातून अगदी कुणीही व्यक्ती स्वत:सोबत घेऊन जाऊ शकेल असे उपकरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले. यात मोटोरोला कंपनीनेही यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली.

या अनुषंगाने मोटोरोला कंपनीत कार्यरत असणारे अभियंता मार्टीन कुपर यांच्या नेतृत्वाखालील चमूने तीन महिने अहोरात्र परिश्रम केल्यानंतर अखेर मोबाईल फोन तयार केला. ३ एप्रिल १९७३ रोजी मार्टीन कूपर यांनी याच मोबाईल फोनवरून पहिला कॉल केला. अर्थात, यासाठी त्यांनी नाट्यमय इव्हेंट रचला. त्यांनी न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन या पॉश एरियात पत्रकारांना रस्त्यावरच मुलाखत दिली. याप्रसंगी मोबाईल फोनचा लाईव्ह डेमो दाखविण्यासाठी त्यांनी थेट आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीतील ( बेल लॅबोरेटरीज आता एटी अँड टी ) अभियंता जोएल एंगल यांनाच पहिला कॉल लावला.

कुपर यांनी एंगल यांना आपण खर्‍या खुर्‍या मोबाईल फोनवरून बोलत असल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार पत्रकारांच्या समोर भर रस्त्यात घडला. यामुळे मोबाईल फोनवरून केलेला पहिला कॉल हा कॅमेर्‍यात कैद तर झालाच पण याची मोठी चर्चा झाली. अर्थात, याचा जोएल यांना जबर धक्का बसला हे सांगणे नकोच ! याबाबत स्वत: कुपर यांनी नंतर अनेकदा विलक्षण मिश्कील शैलीत विवेचन केले आहे.

एखादे उपकरण हे किती लोकप्रिय ठरू शकते याचे उदाहरण मोबाईल फोन पेक्षा दुसरे कोणतेही देता येणार नाही. आज ५० वर्षानंतर जगातील एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मोबाईल हँडसेट वापरात आहेत. हे उपकरण बहुतेक लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेले आहे. सुदैवाने मोबाईलचे जनक मार्टीन कूपर हे आज देखील हयात आहेत. मोबाईलच्या पहिल्या कॉलला ५० वर्षे होत असल्याचे औचित्य साधून ‘एएफपी’ या ख्यातनाम वृत्तसंस्थेने त्यांना बोलते केले असता मोबाईलचा इतका झालेला विकास हा त्यांना जितका सुखावणारा वाटतो, तितकीच त्यांना भिती देखील वाटत असल्याची बाब विचारात घेण्यासारखी आहे.

आज मोबाईल फोनला ५० वर्षे पूर्ण होत असतांना गेल्या पाच दशकात झालेले विलक्षण बदल आपण अनुभवले आहेत. तर, येत्या काही वर्षांमध्ये यात नेमके काय बदल होतील याची चुणूक देखील दिसून येत आहे. यात प्रामुख्याने स्मार्टफोनचा आकार हा लहान व याची जाडी कमी होत असतांनाच याचा डिस्प्ले हा मोठा होईल. अर्थात, फोल्डेबल वा रोलींग डिस्प्लेच्या माध्यमातून ही बाब शक्य होणार आहे. स्मार्टफोनमधील कॅमेर्‍यासह रॅम आणि स्टोअरेजची क्षमता अजून वाढेल. यात एआयने युक्त असणारी अनेक फिचर्स येतील. आगामी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि ऑग्युमेंटेंड रिअ‍ॅलिटीच्या युगाच्या केंद्रस्थानी अर्थातच स्मार्टफोन असेल. लवकरच आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्जच्या माध्यमातून विविध उपकरणे हे एकमेकांना जुडणार आहेत. यातून ‘कनेक्टेड होम’ व ‘वर्क प्लेस’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारणार असून यातील मुख्य दुवा म्हणून स्मार्टफोन भूमिका निभावणार असून या सर्व बाबींची चुणूक आजच दिसून येत आहे.

ज्यांनी मोबाईल फोनला डेव्हलप करण्यात महत्वाची भूमिका निभावली, आणि अर्थातच या उपकरणावरून पहिला कॉल केला ते मार्टीन कूपर आज ९४ वर्षांचे असले तरी त्यांची बुध्दी तल्लख आहे. ते आज आयफोन-१४ हे अद्ययावत मॉडेल सहजगत्या वापरतात. एका हातात पहिला मोबाईल फोन तर दुसर्‍या हातात ते आज वापरत असलेला आयफोन अशी त्यांनी छायाचित्रासाठी दिलेली पोझ ही ५० वर्षातल्या मोबाईल क्रांतीला एकाच प्रतिमेत विलक्षण प्रत्ययकारी पध्दतीत दर्शविणारी ठरली आहे. याचमुळे या माणसाला आणि मानवी इतिहासावर विलक्षण प्रभाव टाकणार्‍या त्याने तयार केलेल्या उपकरणाला एक मानाचा मुजरा नक्की करावासा वाटतो !

shekhar@shekharpatil.com

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola enggineer martin copper mamde world first mobile call 3 april 1973 phone developed under his leadership tmb 01