Hi mum scam : अलीकडे सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आर्थिक फसवणुकीसाठी लिंक पाठवून किंवा बँक डिटेल्सची माहिती घेऊन लोकांकडून पैसे लुटल्याचे काही अहवालांतून समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांपासून सावध राहिले पाहिजे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांना विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना सावध करणारी एक माहिती समोर आली आहे. यामध्ये फसवूक करणारे पीडितच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे दाखवून मोबाईल हरवल्याच्या बहाण्याणे कुटुंबातील लोकांना पैसे मागत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे ‘हाय मम’ घोटाळा?

‘हाय मम’ किंवा कौटुंबिक तोतयागिरी नावाच्या या घोटाळ्यात फसवणूक करणारे व्हॉट्सअ‍ॅपवर ‘Hi Mum’ सारखे मेसेज पाठवून जवळचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगत कुटुंबातील सदस्यांना संपर्क करतात आणि फोन हरवला किंवा त्याला नुकसान झाले, असे सांगत त्यांना मदत मागतात.

फसवणूक करणारे वेगळ्या क्रमांकाने संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. एकदा पीडित त्यांनी पाठवलेल्या संदेशांच्या जाळ्यात अडकला की ते त्यांना पैसे मागतात. अहवालानुसार, अनेक ऑस्ट्रेलियन या नवीन फसवणुकीच्या प्रकाराला बळी पडले आहेत. त्यांना ५७.८४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

(‘हे’ ५ फीचर्स मिळाल्यास Iphone 15 दिसेल भन्नाट, वाढू शकते कार्यक्षमता)

अहवालानुसार, फसवूक करणारे पीडितांशी व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क साधतात आणि त्यांचा फोन हरवला किंवा खराब झाला असून नवीन क्रमांकावरून संपर्क साधत आहे, असा दावा करतात. पीडितला फसवणूक कर्त्यांवर विश्वास बसल्यानंतर फसवणूक करणारे त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलसाठी फोटो किंवा खाजगी माहिती मागतात, किंवा तातडीने बिल भरण्यासाठी किंवा फोन बदलण्यासाठी पैसे मागतात. ऑनलाइन बँकिंग तात्पुरते बंद असल्याने किंवा त्यात त्रुटी दर्शवत असल्याने ते कार्डचा वापर करून पैसे काढू शकत नाही, असे सांगून आपल्या मागणीचे समर्थन करतात.

अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन कन्झ्युमर आणि कॉम्पिटिशन कमिशनने हाय मम घोटाळ्यामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. १ हजार १५० पेक्षा अधिक लोक या घोटाळ्याला बळी पडले आहेत.

(Reuse old smartphone : जुन्या फोनला बनवू शकता CCTV, आणखी कोणत्या कामासाठी वापरू शकता? जाणून घ्या)

हा घोटाळा ऑस्ट्रेलियामध्ये घडला आहे. मात्र, भारतीयांनीही अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. अलीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. लिंक पाठवून आर्थिक लूट, क्यूआर कोड घोटाळा, डेटा हॅकिंग असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे, सोशल मीडिया वापरताना खाजगी माहिती आणि बँक डिटेल्स उघड होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

ही काळजी घ्या

  • तुमचा ओटीपी कोणालाही शेअर करू नका.
  • तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे पीन किंवा सीवीवी क्रमांक कोणालाही शेअर करू नका.
  • अज्ञात क्रमांकावरून आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.
  • सुरक्षित आणि अधिकृत संकेतस्थळेच उघडा.
  • ऑलनाइन शॉपिंग करताना तुमचा पेमेंट तपशील सकेतस्थळावर कधीही सेव्ह करू नका.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp user loss over 57 crores due to hi mum scam ssb