Blinkit Laptop Delivery : दैनंदिन जीवनात लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, किराणा सामान अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला घरपोच करणारा क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ब्लिंकिट (Blinkit) आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण, आता कंपनी खाण्या-पिण्याच्या पदार्थ आणि जीवनाश्यक वस्तूंनंतर इलेक्ट्रॉनिक्स विभागात पाऊल टाकणार आहे. ‘ब्लिंकिट’चे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी एक्स (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता ‘ब्लिंकिट’द्वारे (Blinkit) तुम्ही लॅपटॉप, मॉनिटर्स, प्रिंटर आणि बरेच काही थेट ऑर्डर करू शकणार आहात आणि फक्त १० मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या वस्तू घरपोच डिलिव्हर केल्या जाणार आहेत.

हा उपक्रम ‘ब्लिंकिट’ची आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड्सशी असलेली पार्टनरशिप दर्शवितो आहे; ज्यामुळे ग्राहकांना तंत्रज्ञानविषयक वस्तू अगदी सहज खरेदी करणे शक्य होणार आहे. सध्या Blinkit तुम्हाला एचपी कंपनीचे लॅपटॉप, लेनोवो, Zebronics, MSI वरून मॉनिटर्स, कॅनॉन व एचपीवरून प्रिंटर ऑफर करत आहे. भविष्यात Epson कॅटरिंजेस (Epson cartridges)देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हेही वाचा…Swiggy : फक्त १५ मिनिटांत जेवण पोहोचणार तुमच्या घरी! स्विगीची नवी सुविधा नेमकी कशी आहे? जाणून घ्या

पोस्ट नक्की बघा

‘ब्लिंकिट’चे सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी सांगितले की, ही सेवा सध्या दिल्ली एनसीआर, पुणे, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ या प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. मोठ्या वस्तूंसाठी डिलिव्हरी विशेषत: ब्लिंकिटच्या खास लार्ज-ऑर्डर फ्लीटद्वारे हाताळली जाईल. त्याचप्रमाणे कंपनीने आपल्या पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करण्याच्या योजनांचे संकेत दिले आहेत आणि लवकरच अधिक ब्रॅण्ड्स आणि उत्पादने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

लॅपटॉप, मॉनिटर्स, प्रिंटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फक्त १० मिनिटांत वितरित करण्याची ‘ब्लिंकिट’ची नवीन सेवा ग्राहकांसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते. पण, लहान स्टोअर्स आणि अधिकृत डीलर्सना यांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. या मॉडेलसह, ब्लिंकिट व्यापाऱ्यांना दूर सारून ग्राहकांना स्टोअरला भेट देण्याच्या त्रासाशिवाय स्पर्धात्मक किमतींत उत्पादने विकत घेण्याची सुविधा मिळवून देत आहे.

ब्लिंकिट रुग्णवाहिका (Blinkit)

गेल्या आठवड्यात, प्लॅटफॉर्मने १० मिनिटांची रुग्णवाहिका सेवा सुरू केली; जी गुरुग्राममध्ये २ जानेवारीपासून सुरू झाली आहे. परिसरातील युजर्स आता ब्लिंकिट ॲपद्वारे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका बुक करू शकतात. ब्लिंकिट (Blinkit) १० मिनिटांत तुमच्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी सक्षम असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी एक महत्त्वपूर्ण सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम येत्या काही महिन्यांत इतर शहरांमध्ये विस्तारण्याची अपेक्षा आहे. त्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की, रुग्णवाहिका सेवेसाठी ब्लिंकिटच्या क्विक कॉमर्स कंपनीला देशाच्या कायद्यांचे पालन करावे लागेल. त्याशिवाय इतर कायदेशीर बाबींचीही योग्य काळजी घेतली गेली पाहिजे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can now buy laptops monitors and printers on blinkit and get delivered in 10 minutes asp