फिट राहणे म्हणजे केवळ निरोगी राहणेच नव्हे तर, शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम होऊन दैनंदिन जीवनात वेगवेगळय़ा पातळय़ांवरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असणे होय. सध्याच्या धावपळीच्या जगात शरीराची काळजी घेण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. उलट, धकाधकीच्या जीवनशैलीमुळे खाणे, पिणे, झोपणे या मूलभूत गरजांच्या बाबतीतही हेळसांड होते. या दुर्लक्षाचे परिणाम आयुष्यात उत्तरोत्तर दिसू लागतात. किंबहुना अलीकडच्या काळात अगदी तिशी-पस्तिशीपासूनच आरोग्याबाबत खबरदारी न घेतल्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. अशा वेळी आपल्या दैनंदिन क्रियांमधूनच ‘फिट’ राहण्याची संकल्पना अलीकडे रूढ झाली आहे. विविध प्रकारचे ‘फिटनेस गॅझेट्स’ या संकल्पनेचे मूळ आहे. गेल्या काही वर्षांपासून अशा फिटनेस गॅझेटची मागणी वाढत असून त्यांच्या माध्यमातून स्वत:च्या तब्येतीवर काटेकोर लक्ष ठेवण्यास मदत होऊ लागली आहे.

व्यायाम किंवा अन्य कोणत्याही कसरतींसाठी स्वतंत्र वेळ न काढता चालणे, धावणे अशा नियमित हालचालींतून शरीरातील अतिरिक्त कॅलरी उत्सर्जित करण्याचा मंत्र फिटनेस गॅझेटनी आपल्याला दिला आहे. या दैनंदिन क्रिया आपण एरव्हीही करत असतोच. परंतु, त्यातून खरंच आपला व्यायाम होतोय का? त्या हालचालींमुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतोय का? आपल्या रोजच्या हालचालींनुसार आपल्याला किती तासांची झोप पुरेशी आहे? किंवा या हालचालींनंतरही थकवा येऊ नये यासाठी किती आहार घेतला पाहिजे? अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहजासहजी मिळत नाही. मात्र, फिटनेस गॅझेटनी अगदी चालता-बोलता ही उत्तरे देण्याची सोय आता उपलब्ध करून दिली आहे. आपल्या दिवसभरातील प्रत्येक हालचालींची आरोग्याच्या दृष्टीने नोंद ठेवून त्या माहितीचे विश्लेषण करून तुमच्या तब्येतीचा रोजचा आलेख हे गॅझेट मांडतात.

दिवसभरात किती पावले चालला, पावलांमधील अंतर, वेग, हृदयाच्या ठोक्यांची गती, झोप, कॅलरी उत्सर्जन अशा अनेक बाबतीत तुम्हाला तत्काळ इशारा देणारी ही यंत्रणा सध्या खूप लोकप्रिय बनत चालली आहे. अगदी मोठमोठय़ा नामांकित कंपन्यांच्या हजारो रुपयांच्या गॅझेटपासून अगदी एक-दोन हजारांपर्यंत वेगवेगळय़ा प्रकारचे फिटनेस गॅझेट सध्या उपलब्ध आहेत. किमतीनुसार प्रत्येक गॅझेटमध्ये वैशिष्टय़े वाढत जातात. अशा वेळी आपल्याला कोणत्या प्रकारचे गॅझेट उपयुक्त आहे, हे जाणून घेऊन त्यानुसार निवड करणे आवश्यक आहे.

‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ निवडताना..

आपल्या दैनंदिन हालचालींची नोंद ठेवणारे हे ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ तसे अगदी साधे असतात. पण तरीही त्यापैकी आपल्यासाठी उपयुक्त आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारे गॅझेट शोधताना खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.

डिझाइन ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ हे ब्रेसलेट, बॅण्ड, घडय़ाळ अशा विविध प्रकारांत उपलब्ध असतात. यातील प्रत्येक प्रकारात शारीरिक हालचालींची नोंद हा सामायिक धागा असला तरी, त्यांच्या दर्जा व किमतीनुसार त्यात इतर वैशिष्टय़ांचीही भर पडते. उदाहरणार्थ, केवळ एका बॅण्डसारख्या दिसणाऱ्या ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’मध्ये तुम्हाला छोटा डिस्प्ले स्क्रीन मिळतो. शिवाय तुमच्या शारीरिक हालचालींची नोंद वा विश्लेषण जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा आधार घ्यावा लागतो. याउलट एखाद्या ‘स्मार्टवॉच’मध्ये या गोष्टी तुम्ही थेट घडय़ाळाच्या स्क्रीनवरच पाहू शकता. याखेरीज अगदी साध्या रबर बॅण्डपासून मौल्यवान धातूनी बनवलेले ब्रेसलेट तुम्हाला बाजारात पाहायला मिळतील.

वैशिष्टय़े  तुम्हाला ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ कशासाठी हवा आहे, हे आधी ठरवून घ्या. जर वजन कमी करणे हे तुमचे ध्येय असेल तर तुम्हाला पावलांची नोंद व कॅलरी उत्सर्जनाची नोंद ठेवणाऱ्या गॅझेटची गरज लागेल. तुम्ही सायकलपटू वा धावपटू असाल तर तुमच्या ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’मध्ये वेग, अंतर, हृदयाची गती अशा गोष्टींची नोंद करता आली पाहिजे. तुम्ही धकाधकीच्या जीवनशैलीत वावरणारे असाल तर झोप, हृदयाची गती, हालचाली अशी वैशिष्टय़े असलेले ‘ट्रॅकर’ तुम्हाला उपयोगी पडू शकते.

किंमत सध्या बाजारात अगदी एक हजारापासून ४०-५० हजार रुपयांपर्यंतचे ‘अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर’ उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या खिशाला परवडेल, असे फिटनेस ट्रॅकर निवडताना त्यात तुम्हाला आवश्यक असलेली वैशिष्टय़े आहेत का, याची चाचपणी करून घ्या.

आघाडीचे ‘फिटनेस ट्रॅकर’

 

ह्य़ुआई बॅण्ड प्रो २

  • ‘ह्य़ुआई बॅण्ड प्रो २’ हे बाजारातील स्वस्त पण जास्तीतजास्त वैशिष्टय़े पुरवणारे गॅझेट आहे. आयओएस आणि अ‍ॅण्ड्रॉइड अशा दोन्ही कार्यप्रणालींशी सुसंगतपणे ते काम करते. यामध्ये चालणे, झोप, हृदयाची गती मोजण्यासोबत व्हीओ२ मॅक्स सेन्सर, जीपीएस अशी वैशिष्टय़े समाविष्ट आहेत. या ‘बॅण्ड’वर छोटी स्क्रीन असल्याने त्यावर तुमच्या हालचालींचे ‘नोटिफिकेशन’ येतात. हे गॅझेटही ‘वॉटर प्रूफ’ असून ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी जोडता येते.
  • किंमत ६९९९ रुपये

 

‘मूव्ह नाऊ’

  • आयओएस आणि अ‍ॅण्ड्रॉइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर चालू शकणारे हे गॅझेट दिसायला अतिशय वेगळे आहे. क्षेपणास्त्रांमध्ये दिशा यंत्रणेसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘९-अ‍ॅक्सिस अ‍ॅक्सिलरोमीटर’ या तंत्रज्ञानाचा यात गॅझेटमध्ये वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे अ‍ॅप केवळ तुमच्या चालणे, कॅलरी यांचीच नव्हे तर अन्य हालचालींचीही नोंद ठेवते. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही धावणे, पोहणे, जिममधील व्यायाम यांच्याशी संबंधित नोंदीही पाहू शकता. याची बॅटरी सहा महिन्यांपर्यंत कार्यरत राहते. मात्र, या गॅझेटला डिस्प्ले नसल्याने ब्लूटुथने स्मार्टफोनशी जोडून तुम्ही हा तपशील पाहू शकता.
  • किंमत : अंदाजे २८४४ ते ४२९९ रुपये.

 

फिटबिट फ्लेक्स २

  • कमी किमतीत जास्तीत जास्त वैशिष्टय़े पुरवणाऱ्या फिटबिट कंपनीचा हा ‘फिटनेस बॅण्ड’ आयओएस व अ‍ॅण्ड्रॉइड या दोहोंवर काम करतो. या गॅझेटची बॅटरी एकदा चार्जिग केल्यावर पाच दिवस सहज टिकते. चालणे, अंतर, कॅलरी उत्सर्जन या गोष्टींची हे गॅझेट नोंद ठेवतेच पण त्यासोबतच व्यायाम आणि झोप यांचीही हा बॅण्ड व्यवस्थित नोंद ठेवतो. तसेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून वापरकर्त्यांला माहितीही पुरवतो.
  • किंमत : ४०६१ रुपये.

 

गार्मिन व्हिवोफिट ३

  • फिटनेस गॅझेटच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या गार्मिनचे हे गॅझेट आयओएस व अ‍ॅण्ड्रॉइडवर काम करते. या गॅझेटची बॅटरी किमान वर्षभर सहज टिकते. त्यामुळे एक वर्षांनंतरच ती चार्ज करावी लागते. हे गॅझेट तुमची दिवसभरातील पावले, कॅलरी, अंतर, व्यायामादरम्यानच्या हालचाली, झोप अशा सर्व गोष्टींची नोंद ठेवते. यासाठी तुम्हाला गार्मिन कनेक्ट स्मार्टफोन अ‍ॅप तुमच्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे लागते. या गॅझेटची स्क्रीन छोटी असली तरी, त्यावरून तुम्हाला नोटिफिकेशन्स आणि आवाजी सूचना दोन्ही मिळतात.
  • किंमत : ३८८६ रुपये.

 

ह्य़ुआई फिट

  • ह्य़ुआईचे हे ट्रॅकर घडय़ाळासारखे असून वापरण्यास अतिशय साधेसहज आहे. या गॅझेटमध्ये इतर सामायिक वैशिष्टय़ांसह हृदयाची गती मोजण्याचीही सुविधा आहे. अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस अशा दोन्ही कार्यप्रणालींशी सुसंगत असलेले हे गॅझेट ब्लूटुथच्या मदतीने स्मार्टफोनशी जोडता येते.
  • किंमत : ९९९९ रुपये