उपाययोजना करण्याबाबत महापालिका उदासीन
मीरा-भाईंदरमधील नागरिक सध्या डासांच्या वाढत्या संख्येने त्रस्त झाले आहेत. डास निर्मूलनासाठी महापालिका प्रशासन कोणतेही प्रयत्न करत नाहीत. गेल्या वर्षभरात महापालिकेने डासांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेने यंदा डासांचा उपद्रव वाढला असल्याने मीरा-भाईंदरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
थंडीच्या दिवसात डासांची संख्या वाढतच असते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. डासांची पैदास प्रमाणाबाहेर वाढली असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने डासांची संख्या वाढली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. मात्र त्याचसोबत गटारांची वेळोवेळी साफसफाई होत नसल्याने गटारात तुंबून राहात असलेले पाणी, डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यात प्रशासनाला आलेले अपयश ही कारणेही डासांच्या उपद्रवाला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. डासांच्या वाढत्या उपद्रवासाठी सध्या इमारतींच्या शौचालयांच्या टाकींवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, याठिकाणी डासांची सर्वाधिक उत्पत्ती होत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून शौचालयांच्या टाकींमधून औषध फवारणी सुरू केली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डासांवर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.
धृवकिशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक

महापालिकेचे अपयश
* डासांच्या प्रतिबंधासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या औषध फवारणीच्या वेळापत्रकातही कोणताही ताळमेळ नाही. प्रत्येक प्रभागासाठी औषध फवारणीसाठी एक गाडी देण्यात आली आहे. मात्र शहराच्या अनेक भागांत या गाडय़ा औषध फवारणीसाठी फिरलेल्या दिसूनच येत नाही. परिणामी, डासांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.
* प्रत्येक प्रभागात १५ दिवसांनी एकदा गाडी फिरण्याचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे, परंतु अनेक वेळा या गाडय़ा बंद असल्याने वेळेवर औषध फवारणी होत नाही.
* डेंग्यू, मलेरिया यांसारख्या विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांसाठी उपाययोजना कशी करायची याची शास्त्रोक्त माहितीच महापालिका कर्मचाऱ्यांकडे नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira bhayandar residents suffer of mosquitoes