ठाण्यातील अभिनय कट्टा चालवणारे किरण नाकती आणि त्यांच्या टीमने बनविलेला ‘सिंड्रेला’ हा चित्रपट बघण्याचा योग नुकताच आला. त्यात अतिशय गरीब वस्तीतील अनाथ बहीण-भावाचा जीवन संघर्ष भावपूर्ण स्वरूपात दाखविण्यात आलेला आहे. गरीब वस्तीच्या पाश्र्वभूमीवर आधारित अनेक चित्रपट पूर्वी आलेले आहेत. ‘बुटपॉलिश’मधील शंकर घाणेकरांचा जिवंत अभिनय अजूनही लक्षात राहिला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक डॉयनी बायलो यांचा २००९ साली अॅकॅडमी पुरस्कार विजेता आणि जगभर गाजलेला, ‘स्लम डॉग मिलिनिओर’ हा चित्रपट मुंबईतील अशाच वस्तीतील जमाल मलिक या नावाच्या व्यक्तिरेखेवर आधारित होता. या चित्रपटाची आणि सिंड्रेला यांची तुलना करावयाची अथवा सिंड्रेला चित्रपटाचे समीक्षण करणे हा या लेखाचा हेतू नाही. माझा तो अधिकारही नाही. मला हा चित्रपट बघताना आणि बघून झाल्यावर काय वाटले हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
भीक मागून दिवस काढणारा, बारा-तेरा वर्षांचा एक अनाथ आर्त्यां नावाचा मुलगा. त्याची पाच-सहा वर्षांची धाकटी बहीण राणी. आपल्या बहिणीचा बाहुलीचा हट्ट पुरविण्यात आर्त्यां कसा प्रयत्न करतो, ही या सिनेमाची थोडक्यात गोष्ट. गरीब आणि बकाल वस्ती. त्यामध्ये राहणारी तशीच माणसे, या सर्वाचे अतिशय प्रभावीपणे केलेले वास्तववादी चित्रण, हे सर्व बघून आपले पांढरपेशी मन थरारते. आपल्या विश्वाबाहेरचे हे भयानक जग स्वीकारायला आपले मन धजत नाही. पन्नास वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यावर, देशातील गरिबीचे भांडवल आपल्या चित्रपटातून करतात असा आरोप होत असे. आता जगातील सर्वच महानगरांत बकाल वस्ती ही अविभाज्य भाग आहे.
एकदा छोटय़ा राणीला एका खेळण्याच्या दुकानात एक सुंदर बाहुली दिसते. बालसुलभ मनाने दुकानातली बाहुली तिला खूप आवडते. तिच्या मनात घर करून बसते. राणी आपल्या आर्त्यांकडे, तिच्या दादूकडे हट्ट धरते. तिच्या त्या बाहुलीसाठीच्या वरील हट्टामुळे त्यांच्यावर संकटे कोसळतात, मानहानीचे प्रसंग उद्भवतात. त्या बाहुलीचे नाव सिंड्रेला आहे हे राणीला कळते. सिंड्रेला तिच्या भावविश्वाचे एक स्वप्न बनते.
इथून सुरू होतो एक निरागस आणि संवेदनशील संघर्ष. एका बाजूस राणीस स्वप्नवत वाटणारी दुकानातील बाहुली आणि दुसरीकडे तिच्या प्रेमापोटी ते स्वप्न साकार करण्यासाठी केलेले तिच्या दादूचे प्रयत्न. आजीने केलेले संस्कार ‘आयुष्यात भीक कधी मागू नकोस आणि चोऱ्या करू नकोस’ आर्त्यांच्या मनावर रुजलेले असतात. म्हणूनच तो प्रामाणिकपणे मेहनत करीत राहतो. त्या मेहनतीला तो हुशारीची म्हणजे स्मार्टनेसची जोड देतो. शेवटी एवढे केले तरी त्याचा एकाकी लढा कमी पडतो. शेवटी मदतीला येतात ते त्या वस्तीतील त्याचे सर्व मित्र. आता हे स्वप्न फक्त राणीचे राहात नाही तर वस्तीतील सर्वाचे ते स्वप्न होते. या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांनी शेवटी जेव्हा राणीचे स्वप्न साकार होते, तेव्हा त्याचा आनंद सर्व वस्तीला झालेला असतो.
निरागसता आणि संवेदनशीलता हे शब्द आणि त्यातील भावना हे आता आपल्या समाज मनातून सीमापार झालेले आहेत. दुर्दैवाने आत्ताच्या भौतिक जगात, शालेय वयातील मुलांचा त्याच्याशी दुरान्वयेही संबंध राहिला नाही. केवळ या भावना जागवण्यासाठी तरी हा चित्रपट आपल्या मुलांना पालकांनी आणि विद्यार्थ्यांना शाळेने अवश्य दाखवावा असे मला मनापासून वाटते.
सहसा हा विषय इथेच संपला असता. परंतु योगायोगाने याच आठवडय़ात रोटरी मिड टाऊन यांनी शिवसमर्थ शाळेत, चित्रकला शिक्षकांची एक कार्यशाळा आयोजित केली होती. स्मार्ट ठाणे शहर या संकल्पनेला धरून विद्यार्थ्यांकडून शाळेच्या भिंतींवर चित्रे काढून घेण्याची त्यांची योजना आहे. शिक्षकांच्या माध्यमातून ही संकल्पना विद्यार्थ्यांना कळावी हे कार्यशाळेचे प्रयोजन होते. जमलेल्या कला शिक्षकांना मी मार्गदर्शन करावे अशी आयोजकांची इच्छा होती. कार्यशाळेच्या सुरुवातीस अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी स्मार्ट सिटी संकल्पना उपस्थित शिक्षकांना समजून सांगितली होती. चव्हाणसाहेबांचे सादरीकरण सुरू असताना स्मार्ट ठाणे सिटी म्हणजे राणीला स्वप्नवत वाटणारी दुकानातील लोभस सिंड्रेला आहे असे मला वाटू लागले होते. आपले शहर हे असेच सुंदर असावे असे स्वप्न ठाणेकरांनी फार पूर्वीपासून बाळगलेले आहे. त्यातही मुलांच्या मनातील आणि स्वप्नातील शहर अगदीच वेगळेसुद्धा असू शकते. त्यांच्या चिमुकल्या स्वप्नात खेळण्यासाठी पुरेशी मोकळी हवा आणि मैदाने, सक्षम आरोग्य व्यवस्था, पैशाने परवडतील असे गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यक्तिगत सुरक्षितता, हे सर्व काही असू शकेल. मी शिक्षकांना एवढेच आवाहन केले की, विद्यार्थ्यांच्या अमूर्त कल्पनांना वाव देण्याची ही संधी आहे.
इच्छा, आकांक्षा ही स्वप्न स्वरूपात असतील किंवा कागदावर असतील, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतात, हा संदेश सिंड्रेलाने आपल्याला दिलेला आहे. आपण सर्व ठाणेकर सिनेमातील वस्तीतील माणसांप्रमाणे भावी पिढीचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार का, याचे उत्तर देण्याआधी सर्वच ठाणेकरांनी ‘सिंड्रेला’ बघणे अनिवार्य आहे.
शेवटी हजारो कोटी खर्च करून ठाणे स्मार्ट सिटी होईल, परंतु शहर सुंदर, श्रीमंत आणि संपन्न होते ते शहराच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक वारसा आणि परंपरांमुळे या क्षेत्रात क्रियाशील असणाऱ्या व्यक्ती आणि संस्था शहराला खऱ्या अर्थाने श्रीमंत अथवा स्मार्ट बनवितात, हेच सत्य आहे!