सहय़गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी।
नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तीरी।।
साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी।
तेथे जागृत रामदास विलसे, जो हय़ा जना उद्धरी।।
सज्जनांचे वसतिस्थान असलेल्या समर्थाच्या सज्जनगडाचे कवी अनंत यांनी केलेले हे वर्णन! सहय़ाद्रीच्या मुख्य धारेच्या एका शिरेवर, उर्वशी ऊर्फ उरमोडी नदीच्या काठाशी हा गड! साताऱ्याजवळच्या अजिंक्यताऱ्याहून पश्चिम अंगाला नजर टाकली तर डोंगरदऱ्यांच्या खेळात तो बुद्धिबळातील एखाद्या सोंगटीप्रमाणे उठून दिसतो. अशा या सज्जनगडावर शेकडो दुर्गप्रेमींच्या उपस्थितीत ७, ८, ९ फेब्रुवारी रोजी नुकताच चतुर्थ दुर्ग साहित्य संमेलनाचा सोहळा रंगला आणि महाराष्ट्रातील साऱ्याच गडकोटांमध्ये चैतन्य संचारले. दुर्गसाहित्यापासून ते दुर्गसाधनांपर्यंत आणि दुर्गसंवर्धनापासून ते त्याच्या पर्यटनविकासापर्यंत अशी मोठी चर्चा इथे झडली, परिसंवाद रंगले, प्रदर्शने मांडली गेली, माहितीपट दाखवले गेले, दुर्गविषयक स्पर्धा-सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि ज्यातून महाराष्ट्राला जणू दुर्गजागरणाचा मंत्रच मिळाला.
महाराष्ट्र हा किल्ल्यांचा प्रदेश! या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले दुर्ग अन्यत्र कुठेही नाहीत. इतिहास, भूगोल, पर्यटन, स्थापत्य, कला, संस्कृती, साहित्य, विज्ञान, पर्यावरण, संरक्षण, स्थानिक समाज आणि चालीरीती अशा विविध अंगांनी हे किल्ले गेली अनेक शतके आमच्या जीवनाशी जोडले गेलेले आहेत. यामुळे महाराष्ट्र धर्म, संस्कृती आणि त्याची जडणघडण यांचा ज्या-ज्या वेळी विचार होतो, त्या-त्या वेळी या गडकोटांची वाट चढावी लागते.
महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या या गडकोटांचे समाजाशी असलेले हे ऋणानुबंध अधिक घट्ट, निकोप आणि मुख्य म्हणजे अभ्यासू, विधायक करण्याच्या हेतूनेच ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळा’ची स्थापना झाली आहे. यासाठी मंडळाच्या वतीने दरवर्षी एखाद्या किल्ल्याच्या सान्निध्यात दुर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी २००९ मध्ये राजमाची, २०१२ मध्ये कर्नाळा, २०१३ मध्ये विजयदुर्ग आणि यंदा सज्जनगडावर या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘किल्ले सज्जनगड दुर्ग संमेलन समिती’ या संमेलनाची आयोजक संस्था होती. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गो. बं. देगलुरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष तर सातारचे छत्रपती शिवाजीराजे भोसले हे स्वागताध्यक्ष होते.
दोन दिवस कुठल्यातरी दुर्गाच्याच परिसरात महाराष्ट्रभरातील दुर्गप्रेमींना एकत्र करत, दुर्गाच्या या नानाविध विषयांवर चर्चा करत हे संमेलन रंगते. यासाठी ७ च्या पूर्वसंध्येपासूनच महाराष्ट्रभरातील दुर्गप्रेमी या संमेलनासाठी येऊ लागले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत दुर्गप्रेमींचा हा मेळा शेकडय़ात गेला. इकडे तोवर सारा सज्जनगड स्वागत कमानी, फुलांची तोरणे, रांगोळय़ांनी सजला होता. इतिहासाच्या त्या तट-बुरुजांवर भगवे फडफडू लागले होते. या उत्साहातच शिंगांच्या ललकाऱ्या झाल्या आणि ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. दुर्गावरील आद्य साहित्याची ही दिंडी मर्दानी खेळ, साहसी प्रात्यक्षिके आणि विविध सांस्कृतिक आविष्कार फुलवत संमेलनस्थळी पोहोचली. उद्घाटन सोहळ्य़ात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उद्घाटक 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची एका दुर्गावर ‘महाराष्ट्रातील दुर्ग’ या विषयावर घेतलेली मुलाखत या सोहळय़ाचा कळसाध्याय ठरली. अभिजित बेल्हेकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत शिवशाहिरांनी महाराष्ट्रातील दुर्गनिर्मिती, इतिहास, भूगोल, वर्तमान आणि भविष्यातील महत्त्व या अशा अनेक दुर्गअंगांना स्पष्ट करतानाच त्यांच्या दुर्गभ्रमंतीच्या दुर्मिळ आठवणीही जागवल्या. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात महाराष्ट्रभरातील विविध गडांचे वारकरी सामील झाले होते. महाराष्ट्रात दुर्ग पाहण्याची संस्कृती रुजून आता बरीच वष्रे लोटली आहेत. सुरुवातीच्या काळात इतिहास प्रेमाने, शिवकाळाने भारावून जात लोक या गडांवर जात होते. आज ही दोन मुख्य कारणे तर आहेतच, पण याशिवाय गिर्यारोहण-भटकंतीच्या ओढीने, इतिहास, भूगोल, पर्यावरणाच्या अभ्यासासाठी, व्यायामाच्या हेतूने, छायाचित्रण-चित्रकला आदी सर्जनशीलतेच्या ओढीने, तर कुणी तणावमुक्तीसाठी-मनशांतीसाठीदेखील या गडकोटांवर जात आहेत. दुर्ग आणि त्यांच्याभोवती वावरणाऱ्या याच संस्कृतीला एक व्यासपीठ, पाठबळ आणि दिशादर्शन करण्याचे काम हे दुर्ग साहित्य संमेलन करत आहे. राजमाची, कर्नाळा, विजयदुर्गपाठोपाठ सज्जनगडावरचे यंदाचे या संमेलनाचे चौथे पाऊल होते. या प्रत्येक नव्या पावलाबरोबर नवनवे दुर्ग आणि दुर्गप्रेमी जोडले जात आहेत. दुर्गप्रेमींचा समाज बांधला जात आहे. हे दुर्ग कसे पाहायचे, कसे वाचायचे, ते कसे जगवायचे इथपासून ते त्याच्या हृदयातील दुर्गगोष्टी जाणून घेण्याचे काम यातून घडत आहे. या संमेलनानंतर अनेक गडांवर संवर्धनाचे कार्य सुरू झाले, दुर्ग साहित्य निर्मितीला चालना मिळाली, चित्रकलेपासून कीर्तनापर्यंत अनेक कलाविष्कार दुर्गाशी जोडले गेले. आमचेच दुर्ग आम्हाला नव्याने कळायला लागले.
दुर्ग आणि भूगर्भशास्त्र, दुर्ग आणि छायाचित्रण, दुर्गावरील जलसंधारण, दुर्गावरील वनस्पती, दुर्ग आणि संरक्षण व्यवस्था हे आणि असे कितीतरी नवनव्या अभ्यासाचे, शोधाचे विषय या संमेलनातून पुढे आले.
चार दिवसांच्या या सोहळ्यातून गडाभोवतीच्या गावांमध्ये हालचाल निर्माण होते. अर्थव्यवस्थेला चालना मिळते. स्थलप्रसिद्धीतून भविष्यात स्थानिकांसाठी पर्यटन व्यवसायाच्या चार संधी निर्माण होतात. एकाचवेळी दुर्ग जागरण आणि स्थानिकांना रोजगार या दोन्ही गोष्टींसाठी हे दरवर्षीचे संमेलन निमित्त ठरते. आमचे जागोजागीचे किल्ले वाचवायचे असतील तर त्यासाठीची ही एक आदर्श पाश्र्वभूमी आहे. आजवरच्या चारही संमेलनांचा हा अनुभव आहे आणि त्याचे यशही इथेच कुठेतरी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2014 रोजी प्रकाशित
सज्जनगडचे दुर्गजागरण
सज्जनांचे वसतिस्थान असलेल्या समर्थाच्या सज्जनगडाचे कवी अनंत यांनी केलेले हे वर्णन! सहय़ाद्रीच्या मुख्य धारेच्या एका शिरेवर, उर्वशी ऊर्फ उरमोडी नदीच्या काठाशी हा गड!
First published on: 15-02-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cultural event on sajjangarh