सज्जनगडावर नुकतेच चतुर्थ दुर्ग साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने ‘दुर्ग’ या संकल्पनेवर आधारित ‘दुर्गप्रेमी’ हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र आणि दुर्गाचे विशेष नाते आहे. हे नातेसंबंधच या अंकातून दुर्गप्रेमींपर्यंत पोहोचवले आहेत. दुर्ग संकल्पना, त्यांचा इतिहास, भूगोल, विकास, त्यांचे स्थापत्य, कला, साहित्य, निसर्ग-पर्यावरण आणि साहस अशा विविध दुर्ग अंगांचा या विशेषांकात अभ्यासकांकडून वेध घेण्यात आला आहे. हा वेध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर, कुलगुरू गो. बं. देगलूरकर, सुनील चिंचोलकर, डॉ. विजय देव, मुकुंद गोंधळेकर, अभिजित बेल्हेकर, आनंद पाळंदे, डॉ. संदीप श्रोत्री, सीमंतिनी नूलकर, मिलिंद हळबे, भगवान चिले, रमा लोहोकरे आदी अभ्यासकांनी घेतला आहे. या प्रत्येक लेखात त्या-त्या विषयातील दुर्गअभ्यास, संशोधन, माहिती आणि संदर्भमूल्य दडलेले आहे. उत्तम छायाचित्रांची त्यांना जोड आहे. यातील काही लेख स्मरणरंजनात जाणारे आहेत, काही वर्तमानातील वास्तव आहेत, तर काही भविष्याचा वेध घेणारे आहेत. उत्तम कागद आणि चांगल्या छपाईमुळे हा अंक मजकुरासोबतच देखणा आणि संग्राह्य़ झाला आहे. अधिक माहिती आणि अंकासाठी रामनाथ आंबेरकर (९०२९९२९५०० किंवा ०२२-२४३१२६४५) यांच्याशी संपर्क साधावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fort lovers gather on sajjangad