दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन मी खूप थकले, घरातली कामं, प्रवास यांचा मला शीण आला अशा तक्रारी आपण सातत्याने करत असतो. मग कामाहून आल्यावर थोडा वेळ आराम हवा, आठवड्याचे एक किंवा दोन दिवस सुटी असली तरीही आणखी सुटी हवी असेच आपल्याला वाटत असते. वयाच्या अवघ्या तिशी-चाळीशीत आपण असे म्हणत असतो. मात्र वयाची शंभरी पार केलेले आजोबा मात्र आठवड्याचे सातही दिवस काम करतात, तेही न थकता. आता कामाची इतकी एनर्जी त्यांना मिळते तरी कुठून असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर ऐका त्यांची ही गोष्ट
पुण्यातील या आजोबांचे नाव आहे बळवंत घाटपांडे. कामावरील असलेल्या प्रेमामुळे आणि सेवा करण्याच्या वृत्तीमुळे ते न थकता काम करतात. याविषयी सांगताना ते म्हणतात, डॉक्टर म्हणून काम करणे मला अतिशय आनंद देणारे आहे. रुग्णांना सेवा देत असताना माणूसकीचे काम करत असल्याचे समाधान मिळते. मला या व्यवसायातून आतापर्यंत नाव, पैसा, समाधान, आणि लोकांचे प्रेम अशा सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत मला रुग्णांची सेवा करायची असून क्लिनिकमध्ये काम करत असतानाच आपल्याला मरण यावे अशी इच्छाही ते व्यक्त करतात.
आपण वर्कहोलिक असल्याचे सांगत रिकामे बसायला आपल्याला आवडत नाही असेही ते म्हणाले. मी जेव्हा रुग्णांना तपासत नसतो तेव्हा वैद्यकीय जर्नल्स आणि वर्तमानपत्रे वाचून ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले. रुग्णांची अशाप्रकारे सेवा करत असतानाच त्यांना पैशांचा हव्यास नसल्याचेही दिसते ते त्यांच्या फी आकारण्यावरुन. ते प्रत्येक रुग्णाकडून केवळ ३० रुपये घेतात. इतकेच नाही तर आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातील बराचसा भाग ते दानही करतात. त्यामुळे हे डॉक्टर आजोबा सगळ्यांसाठी नक्कीच एक आदर्श उदाहरण आहेत.