मेकअपची कमाल काय असू शकते हे पाहायचं असेल तर कझाकिस्तानमधील सौंदर्य स्पर्धेत घडलेला हा धक्कादायक प्रकार ऐकाच. महिलांसाठी भरवण्यात आलेल्या या सौंदर्य स्पर्धेत २२ वर्षांचा तरुण स्त्री वेशात वावरत होता. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत तो पुरुष आहे हे कोणालाही कळलं नाही.
एलि या तरुणानं मिस वर्च्युअल कझाकिस्तान सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. यासाठी त्यानं आपले स्त्रीवेशातले काही फोटो पाठवले होते. अर्थात मेकअप आणि फोटो एडिटिंगमधल्या तंत्रज्ञानाची कमाल यामुळे त्याचे स्त्रीवेशातले फोटो इतर स्पर्धकांपेक्षा अधिक सरस ठरले. एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेसाठी चार हजारांहून अधिक सौंदर्यवतींनी अर्ज केला होता पण, यात एलिच्या फोटोंची निवड झाली. एलिनं खोटं नाव धारण करुन हे फोटो पाठवले होते. विशेष म्हणजे एलिचे हे फोटो सर्वांनाच आवडले. एलिची निवड या स्पर्धेच्या अंतिम फेरीत करण्यात आली त्यामुळे खोट्यापासून सुरु झालेलं प्रकरण एलिनं थांबवलं.
आपण स्त्री नसून पुरुष असल्याचं त्याने नंतर परीक्षकांसमोर कबुल केलं. धक्कादायक खुलासा केल्यानंतर एलिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. एलि मॉडेलिंग करतो. १७ वर्षांचा असल्यापासून एलि मॉडेलिंगच्या क्षेत्रात आहे. आपण गंमत म्हणून या स्पर्धेसाठी फोटो पाठवले होते यात कोणताही दुसरा हेतू नव्हता. माझी अंतिम फेरीत निवड झाल्यानंतर मला माझी चुक लक्षात आली. मला इतर स्त्रियांवर अन्याय करायचा नव्हता म्हणूनच मी सत्य उघड केल्याची कबुली त्यानं दिली.