डोक्यावर बंदूक ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून गावातील रस्ता बांधून घेतला; उत्तर प्रदेशमधील ३० गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल | 30 booked for getting authorities to construct village road at gunpoint in Gurugram scsg 91 | Loksatta

डोक्यावर बंदूक ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून गावातील रस्ता बांधून घेतला; उत्तर प्रदेशमधील ३० गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणामधील आरोपींनी आधी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळी आरोपींकडे शस्त्र आणि काठ्या होत्या.

डोक्यावर बंदूक ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून गावातील रस्ता बांधून घेतला; उत्तर प्रदेशमधील ३० गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआय आणि रॉयटर्स)

उत्तर प्रदेशमधील गुरुग्राममधील नवरंगपूर गावातील ३० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लोकांमध्ये ब्लॉक समितीच्या माजी अध्यक्षाचाही समावेश आहे. आता तुम्हाला वाटेल यामध्ये विशेष काय आहे. तर ज्या कारणासाठी या ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते कारणही फारच विचित्र आहे. येथील सेक्टर ७८ आणि ७९ मधील रस्त्याचं बांधकाम करणाऱ्या गुरुग्राम मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (जीएमडीए) कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या ३० जणांनी धमकावल्याचा प्रकार घडला आहे. बरं अगदी डोक्यावर बंदूक लावून या ३० जणांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचं कारण म्हणजे गावातील रस्ता दुरुस्त करुन घेणे. गावामध्ये खड्डे पडलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी या ३० गावकऱ्यांनी गन पॉइण्टवर अधिकाऱ्यांकडून काम करुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खड्डे बुजवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने खासगी स्वार्थापोटी हा प्रकार घडवून आणला आहे. ब्लॉक समितीचा माजी अध्यक्ष होशियार सिंगने या विषयाला फोडणी दिली. होशियार सिंगच्या मालिकीच्या पेट्रोल पंपासमोर रस्ता बांधला जावा अशी त्याची इच्छा होती. सिंगने थेट प्रशासनाकडे या पंचक्रोशीमधील सर्व गावांना या ठिकाणी रस्ता बांधून हवा असल्याचा दावा केला. या ठिकाणी २० हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचा सिंगचा आरोप होता.

या प्रकरणामध्ये जीएमडीएच्या उप-विभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार सेक्टर ७८ आणि ७९ मध्ये त्यांची टीम २० तारखेला काम करत होती. “खासगी कंत्राटदार, जीएमडीएची टीम आणि कर्मचारी या साईटवर काम करत असताना ३० गावकरी आहे आणि त्यांनी शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि त्यांच्या डोळ्याला थेट बंदूक लावली. त्यांनी बळजबरीने बंदूकीचा धाक दाखवून तिथून रस्ता बांधण्याच्या कामातील तीन मशीन, रस्ता बांधण्यासाठी मागवलेला कच्चा माल ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी तौरु रोडवर या पेट्रोल पंप समोरील ५० मीटरचा रस्ता बांधून घेतला,” असं तक्रारीत म्हटलं आहे.

या प्रकरणामधील आरोपींनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळी आरोपींकडे शस्त्र आणि काठ्या होत्या. “या कामाचं कंत्राट आधीच खासगी कंत्राटदाराला देण्यात आलं आहे. तो या रस्त्याचं काम करत होता. मात्र या ठिकाणी गावकऱ्यांनी गोंधळ घालून दुसऱ्याच ठिकाणी रस्ता बांधून घेतला ज्यासंदर्भातील उल्लेख कंत्राटामध्ये नाही,” असं जीएमडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यांच ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात म्हटलं आहे.

जीएमडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हा सारा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी गावकऱ्यांविरोधात पोलीस तक्रार केली. “जीएमडीएकडून अशाप्रकारची वर्तवणूक सहन केली जाणार आहे. सरकारी कामांमध्ये अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे चुकीचं आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तपास सुरु केला आहे,” असं जीएमडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी १४८ (दंगल), १४९ (बेकायदेशीरपणे एकत्र येणे), १८६ (सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे), ३२३ (दुखापत करणे), ३५३ (सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं काम करण्यापासून थांबवणे), ४२७ (नुकसान करणे) आणि ५०६ (गुन्हेगारी कृत्य) या भारतीय दंडसंहितेच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती खेकरी दौला पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 13:35 IST
Next Story
मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…