‘ईबे’ या ऑनलाइन वेबसाईटवर जर्मनीतल्या एका आई वडिलांनी आपल्या दीड महिन्याच्या मुलीला विकायला काढले. दीड महिन्याच्या या मुलीचा फोटो वेबसाईटवर पाहताच पोलिसांनी या आई वडिलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
जर्मनीच्या ड्यूसबर्ग शहरात राहणारे हे जोडपे निर्वासित असून काही दिवसांपूर्वीच जर्मनीमध्ये आश्रयाला आले होते. त्यांनी ईबे या ऑनलाईन वेबसाईटवर आपल्या चाळीस दिवसाच्या मुलीला विकायला काढले. या मुलीची इतरही माहिती देत तिची विक्री किंमत चार लाख रूपये ठेवण्यात आली. या वेबसाईटवर जवळपास अर्धा तास या मुलीची जाहिरात सुरू होती आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली. नंतर या वेबसाईटवरून ही जाहिरात हटवण्यात आली. पोलिसांनी ही जाहिरात पाहिल्यावर या मुलीच्या आई- वडीलांना गाठले. हे जोडपे निर्वासित असल्याने पोलिसांची त्यांची अधिक चौकशी केली. तसेच त्यांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. या मुलीला पोलिसांनी बालकल्याण विभागाकडे सोपवले आहे. हे जोडपे ज्या घरात राहतात तिथे इतरही लोक वास्तव्य करतात  त्यामुळे या मुलीची विक्री करण्यात त्यांचाही हात होता का याचाही पोलिस तपास करत आहे. काही दिवसांपूर्वी याच वेबसाईटवर एका नव-याने आपल्या बायकोला विकायला काढले होते. खरे तर संसारात होणा-या भांडणाला वैतागून त्याने तिला धडा शिकवण्यासाठी हे केले होते. पण या मुलीच्या विक्रिची मात्र पोलिसांनी गांर्भीयाने दखल घेतली आहे.