मुंबई. सोन्याची नगरी तर कोणासाठी स्वप्नांची नगरी. ही मुंबई प्रत्येकाला जगायला शिकवते. येथे आलेला प्रत्येक जण काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो, कोणाला पैसा हवा असतो, तर कोणाला चांगलं करिअर. तिच्या आश्रयाला येणा-या प्रत्येकाला ती काहीतरी देत असते. कोणाला श्रीमंती, कोणाला प्रसिद्धी तर कोणाला अनुभव तर कोणाला जगण्याची उमेद. या मुंबईत आलेल्या किंवा असलेल्या प्रत्येकाची एक गोष्ट आहे. अशी गोष्ट जी नक्कीच प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देत असते. ह्युमन्स ऑफ बॉम्बे मुंबईकरांच्या अशाच छोट्या मोठ्या काहाण्यांना आपल्या  फेसबुक पेजवर प्रसिद्धी देत असते.

VIDEO: बिल्डिंगच्या गच्चीवर मृत्यूशी झुंज

आज या फेसबुक पेजवर आहेत आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी भांडणा-या एका महिलेची गोष्ट. १८ वर्षांपूर्वीच नवरा वारला, पदरात तीन मुलींची जबाबदारी टाकून त्याने तिचा निरोप घेतला. तीन मुलींना घेऊन जगायचं कसं असा प्रश्न तिलाही होता. मुंबईत जगायचं तर पैसा हवा. या मुलींचे शिक्षण सोडून त्यांना घरकामाला लाव असे अनेकांनी सल्ले दिले. पण तिने मात्र सगळ्यांशी भांडून आपल्या तिन्ही मुलींना चांगले शिक्षण दिले. पार्ट टाईम जॉब करुन या तिन्ही मुलींनी घरचा अर्थिक भार सांभाळला. आज तिच्या तिन्ही मुली चांगल्या करिअर करत आहेत. गरिबीतूनही आपल्या तिन्ही मुलींना शिकवले याचे समाधान तिच्या चेह-यावर आहे.