एका बँकेमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणू काम करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या मालकीचे ३० लाखांचे शेअर्स त्यांच्या एका शिक्षकाला भेट म्हणून दिले आहे. शिक्षकांनी गरजेच्या वेळी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयडीएफसी फर्स्ट बँकेचे कार्यकारी व्यवस्थापक आणि सीईओ असणाऱ्या व्ही. विद्यानाथन यांनी हे शेअर्स गिफ्ट केलेत. विद्यानाथन यांनी ३० लाख किंमत असणारे एक लाख इक्विटी शेअर्स त्यांना शालेय जिवनामध्ये गणिताचे धडे देणाऱ्या गुर्दील स्वरुप सायनी या शिक्षकांच्या नावे ट्रान्सफर केले आहेत.
विद्यानाथन यांना सायनी यांनी शालेय जिवनामध्ये मदत केली होती. यासंदर्भातील एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये विद्यानाथन यांना मुलाखतीला जाण्यासाठी सायनींनी आर्थिक मदत केली होती. सायनी यांनी विद्यानाथन यांच्या प्रवास भाड्याची सोय केली होती. “विद्यानाथन यांना बीआयटीएसमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्यांच्याकडे मुलाखतीला जाण्यासाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांचे गणिताचे शिक्षक असणाऱ्या सायनी यांनी ५०० रुपयांची मदत केली होती. याच मदतीच्या जोरावर विद्यानाथन मेसरामधील बीआयटीएसमध्ये गेले आणि तिथूनच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पुढे विद्यानाथन यांनी आपल्या क्षेत्रात खूप प्रगती केली” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“त्यानंतर विद्यानाथन यांनी सायनी यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र सायनी हे सतत नोकरी बदल असल्याने त्यांना माहिती मिळू शकली नाही. तरी विद्यानाथन यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने सायनी यांचा शोध सुरुच ठेवला. अखेर सायनी हे आग्र्यामध्ये असल्याचे विद्यानाथन यांना समजले. त्यांनी सायनी यांना कॉल करुन त्यावेळी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. बँकेने नुकत्याच जारी केलेल्या एका पत्रकामध्ये, “विद्यानाथन यांनी स्वत:च्या मालकीचे आयडीएपसी फर्स्ट बँक लिमिटेडचे एक लाख इक्विटी शेअर्स त्यांचे माजी शिक्षक असणाऱ्या गुर्दील स्वरुप सायनी यांच्या नावे ट्रान्सफर केले आहेत,” अशी माहिती दिली आहे.
नेटकऱ्यांनी विद्यानाथन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.