Groom Rejected for Refused Dowry: ‘चांगल्याची दुनियाच राहिली नाही’, असं वाक्य तुम्ही ऐकलं असेल. एखाद्याचं हित साधणं, खरं बोलणं, खरं वागणं, नियमांचं पालन करणं… याला जेव्हा प्रतिष्ठा मिळत नाही किंवा हे चुकीचं कसं आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा आपसुकच तोंडातून वरील वाक्य बाहेर पडतं. सध्या एका नवऱ्यामुलालाही हेच वाक्य बोलावसं वाटत असेल.
भारतात लग्न म्हटलं की, हुंडा, मानपान, घेणं-देणं अशा गोष्टी लपूनछपून केल्या जातात. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात हुंड्याचं हिणकस स्वरुप सर्वांनी पाहिलं. पण असेही काही मुलं असतात जे प्रामाणिकपणे हुंडा नाकारतात. एका मुलाला हुंडा नाकारणं महागात पडलं. कारण हुंडा नाकारला म्हणून त्याच्याकडं संशयानं पाहिलं गेल आणि होणारं लग्न मोडलं.
सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर जिथे हिरीरीने चर्चा होते, अशा रेडिट प्लॅटफॉर्मवर हा विषय सध्या चर्चेत आहे. रेडिटकर्त्यानं त्याच्या २७ वर्षीय चुलत भावाची कथा सांगितली. लग्न ठरलेला चुलत भाऊ रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. त्याच्याकडं गडगंज श्रीमंती आहे. आलिशान गाड्या, बंगला आहे. थोडक्यात नाना पाटेकरांच्या डायलॉगप्रमाणं ‘भगवान का दिया हुआ सबकुछ है’, असं असताना बापुडा हुंड्याची अपेक्षा का करेल?
तर झालं असं की, श्रीमंत असलेला हा लग्नाळू मुलगा एका योग्य वधूच्या शोधात होता. अखेर त्याला साजेशी मुलगी मिळाली. करिअर करण्यासाठी उत्सुक, खानदानी, सुशिक्षित मुलगी मिळाल्यामुळे दोन्ही कुटुंबियांनी लग्नावर एकमत केलं.
हुंड्यात रेंज रोव्हर, डुप्लेक्स फ्लॅट
लग्नाची बोलणी सुरू असताना वधूपित्यानं हुंडा काय घेणार? असा प्रश्न विचारला. नुसता प्रश्न नाही तर त्यांनी नवऱ्याला आलिशान रेंज रोव्हर कार, डुप्लेक्स फ्लॅट देऊ, असं जाहीर करून टाकलं. नवऱ्याचं कुटुंब आधीच श्रीमंत त्यात नियमांना धरून चालत असल्यामुळं गुन्ह्यास पात्र असलेला हुंडा त्यांनी नम्रपणे नाकारला.
म्हटलं ना, चांगल्याची दुनिया नाही. हुंडा नाकारताच मुलीच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. कारण काय? तर वडिलांचं म्हणणं होतं की, उच्च दर्जाच्या माणसाला त्याची योग्य किंमत माहीत असते. हुंडा नाकारतोय, याचा अर्थ त्याच्यात (नवऱ्या मुलात) काहीतरी दोष असणार, अशी सर्व कथा रेडिटकर्त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिली आहे.
एवढंच नाही तर नकाराला समर्थन देताना मुलीच्या वडिलांनी एक अजब तर्कटही मांडलं. ते म्हणाले, “शाओमी किंवा व्हिओ कंपन्यांचे फोन १५ ते २० हजारात येतात. तरीही लोक लाखाहून अधिक महाग असलेल्या आयफोनसाठी रांगा लावतात. का? तर ती त्यांची स्वतःची किंमत असते.”
इतर लग्नाळू मुलं काय म्हणाली?
रेडिटवर इतक खमंग विषय पोस्ट होताच, त्यावर कमेंटचाही पाऊस पडला. जवळपास ५०० हून अधिक लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.