Case of writing wife name as Moti: नवरा-बायकोचं भांडण नेमकं कोणतं वळण घेईल याचा काही नेम नाही. अगदी किरकोळ कारणावरून सुद्धा नवरा-बायकोतली भांडणं घटस्फोटापर्यंत पोहोचतात. असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुर्कीमधल्या एका जोडप्याचं प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आहे. त्याचं झालं असं की, या नवऱ्याने त्याच्या बायकोचा नंबर मोटी म्हणजेच जाडी अशा नावाने सेव्ह केला होता. त्यानंतर बायकोनं थेट घटस्फोटाची मागणी केली. म्हणजे भांडणं नेमकी कशावरून होतील याचा काही नेम नाही.
कहर म्हणजे हा किरकोळ वाद मानसिक छळाच्या केसमध्ये रूपांतरित झाला आणि यावर सुप्रीम कोर्टाने ही भावनिक हिंसा असल्याचा निर्णय दिला. दुसरी बाजू म्हणजे या नवऱ्याने बायकोला अपमानकारक मेसेजही पाठवले होते आणि त्यामुळे बायकोच्या बाजूने हे प्रकरण आणखी मजबूत झाले. हे प्रकरण फॅमिली कोर्टात सुरू होऊन ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आणि तिथे नवऱ्याला दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणात बायकोने घटस्फोटासोबत पोटगीचीही मागणी केली आणि कोर्टाने नवऱ्याला आर्थिक आणि मानसिक नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. हा ऐतिहासिक न्यायालयीन आदेश ठरला कारण मोबाइलमधील सेव्ह केलेला नंबरही आता पुरावा म्हणून सादर केला जाईल.
कोर्टाने नेमकं काय सांगितलं?
कोर्टाने सांगितलं की, बायकोला जाड म्हणणं किंवा तसं नाव सेव्ह करणं ही गंमत नसून इमोशनल व्हायलेंस आहे आणि ते नाती तोडू शकतं. तुर्कीमध्ये वाईट वागणूक किंवा मानसिक छळ हे घटस्फोटासाठी कारणीभूत मानले जाते. इथे मेसेज आणि सेव्ह केलेलं नावही पुरावा म्हणून ग्राह्य धरलं गेलं. नवऱ्याने काउंटर केस करत बायकोवर अविश्वासाची केस केली मात्र कोर्टाने पतीलाच दोषी ठरवलं. या प्रकरणावरून असं दिसून येतं की, लहान गोष्टीदेखील ज्या अपमान करणाऱ्या असतील तर त्यावरही कारवाई होऊ शकते. सोशल मीडियावर यावरून वाद सुरू आहेत की, मोटी हा शब्द प्रेमानेही बोलला जाऊ शकतो.
सोशल मीडियावर वाद
सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच व्हायरल झालं आहे. लोकांचं म्हणणं आहे की, असे शब्द त्यांच्याही फोनमध्ये आहेत आणि ते गंमतीतही वापरले जाऊ शकतात पण ते घटस्फोटापर्यंत पोहोचत नाही. एका युजरने म्हटले की, मोटा-मोटी म्हणजेच जाडी किंवा जाडा असं प्रेमाने म्हणूच शकतो पण त्यामागचा हेतूदेखील महत्त्वाचा आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, अपमान हलक्यात घेऊ नका, तो छळ आहे. या प्रकरणात संबंधित नवऱ्याला पोलीस कोठडी झाली अशी अफवाही पसरली मात्र, कोर्टाने फक्त नुकसान भरपाई आणि दंडात्मक कारवाई केली आहे. भारतातही अशा प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, मात्र अशाप्रकारे केवळ नंबर सेव्ह केलेल्या नावावरून घटस्फोट होणे कधी घडलं नव्हतं. त्यामुळे नात्यामध्ये शब्दांचा अर्थ समजून घ्या नाही तर प्रत्येक लहान लहान लहान गोष्टी पुढे भारी पडतात.
