फ्रान्समध्ये मागील काही दिवसांपासून महिलांनी टॉपलेस होऊन समुद्रकिनाऱ्यावर सनबाथ घ्यावा की नाही या मुद्द्यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. अगदी सोशल मिडियापासून ते राजकारण्यांपर्यंत या विषयावर वेगवगेळी मत व्यक्त करण्यात आल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांना यासंदर्भात स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकावा लागला आहे. मागील आठवड्यात सेंट-मेरी-ला-मेर या समुद्रकिनाऱ्यावर  तीन महिला टॉपलेस होऊन सनबाथ घेत होत्या. या महिला धुम्रपानही करत होती. त्यावेळी तेथे आलेल्या पोलिसांनी या महिलांना कपडे घालण्यास सांगितलं. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी महिलांना कपडे घालण्यास सांगितलं होतं. या कुटुंबाला महिलांना असं अर्धनग्न अवस्थेत पाहणं योग्य वाटत नसल्याने त्यांनी तक्रार केली होती. मात्र हे प्रकरण नंतर चांगलं तापलं आणि थेट व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचे आरोप करण्यात आले. अखेर आता फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी महिलांच्या बाजूने आपले मत मांडले असून महिलांना अशाप्रकारे कपडे घालायला सांगणे व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने चुकीचं आहे असं मत गृहमंत्र्यांनी नोंदवलं आहे. यासंदर्भातील वृत्त बीबीसीने दिलं आहे.

नक्की काय घडलं

फ्रान्समधील पाइरेनीज-ओरिएंटल पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रसारमाध्यांना घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती देणारं एक पत्रकच जारी केलं आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाबरोबर लहान मुलंही होती. त्यांनी पोलिसांना विनंती केली की त्यांनी टॉपलेस होऊन सनबाथ घेणाऱ्या महिलांना कपडे घालण्यास सांगावे. या दोन्ही गटांमध्ये वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी या महिलांजवळ जाऊन त्यांना टॉप घालण्याची आणि छाती झाकण्याची विनंती केली, असं पोलिसांनी पत्रकात म्हटलं आहे. देशातील कोणताच कायदा सेंट-मैरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस बसण्याला विरोध करत नाही, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

पोलिसांनी केलं कबुल की पोलीस कर्मचाऱ्यांचीच चूक झाली

पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केल्याने फ्रान्समध्ये सोशल मिडियावर या घटनेचे पडसाद उमटू लागले. अनेकांनी पोलिसांवर टीका केली. पोलिसांचे प्रवक्ते ले. कर्नल मॅडी श्यरर यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे हे प्रकरण वाढल्याचं म्हटलं. “आम्ही कायम वर्दीत असलो तरी सेंट-मेरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस होण्यासाठी परवानगी आहे,” अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती. तर फ्रान्सचे गृहमंत्री जेराल्ड डर्मेन यांनीही महिलांना शरीर झाकण्यास सांगणं चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं.  ट्विटवरुन यासंदर्भात मत व्यक्त करताना गृहमंत्र्यांनी, “स्वातंत्र्य हे मैल्यवान आहे. तसेच प्रशासनाकडून चूक झाली हे स्वीकारलं पाहिजे,” असं म्हटलं आहे.

टॉपलेस होऊन सनबाथ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण

फ्रान्समध्ये टॉपलेस सनबाथला विरोध करणारा कोणताही कायदा नाहीय. मात्र स्थानिक प्रशासन कपड्यांसदर्भातील नियम जारी करु शकतं. आधीच्या तुलनेत आता फ्रान्समध्ये टॉपलेस होऊन सनबाथ घेणं हे खूपच सामान्य मानलं जातं असं मागील वर्षी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये दिसून आलं होतं. विए हेल्थने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये फ्रान्समधील २२ टक्के महिलांनी आपण कधी ना कधी टॉपलेस होऊन सनबाथ घेतल्याचं नमूद केलं होतं. स्पेनमध्ये हीच आकडेवारी ४८ टक्के तर जर्मनीत ३४ टक्के इतकी आहे.