वेडिंग फोटोग्राफीच्या कक्षा आता वेगाने रुंदावत आहे. फक्त चेहऱ्यावर हसू ठेवून ढिम्मपणे लग्नात उभं राहून फोटो काढण्याचा जमाना कधीच मागे गेला. आता प्रत्येकाला आपल्या लग्नाचे फोटो हटके हवे असतात. तेव्हा फोटोग्राफर आणि छायाचित्रकार त्यात काहीना काही प्रयोग करून हे फोटो अधिक आकर्षक कसे होईल, याचा विचार करत असतात. हल्ली तर लग्नाच्या आधी प्रीवेडिंग करण्याची कल्पनाही जोडप्यांमध्ये खूपच हिट होत चालली आहे. त्यातूनही खर्च करण्याची क्षमता असेल तर अनेकजण फोटोशूटसाठी भारताबाहेरच गेल्याचे तुम्ही पाहिले असेल पण एक जोडपे चक्क फोटोशूट करण्यासाठी चीनमधून भारतात आले आहे. लिंग आणि झँगना भारत एवढा आवडला की लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाचे फोटो भारतातच येऊन काढण्याचं वेड त्यांना स्वस्थ बसू देईना.

खरंतर दोघांना हिंदी समजत नव्हते, ना इंग्रजी बोलता येत होतं. पण तरीही दोघांनी भारत गाठलं. लिंगने याआधी सोशल मीडियावर भारतीय जोडप्यांचे फोटो पाहिले होते. ताजमहाल, राजस्थानमधील किल्ले, समुद्र किनाऱ्यावर काढलेले फोटोला लिंगला एवढे आवडले की आपणही भारतीय पद्धतीचा पेहराव करून फोटो काढण्याचा हट्ट तिने धरला, मग काय दोघांनीही थेट भारत गाठला. इथल्या एका छायाचित्रकाराकडून त्यांनी आपले खास फोटोशूट करून घेतले. पण फोटो काढून घेणं त्यांच्यासाठी आणि छायाचित्रकारासाठी सोप्पी गोष्ट मुळीच नव्हती. कारण छायाचित्रकारांना चिनी भाषा येत नव्हती आणि या जोडप्यांना इंग्रजी येत नव्हती. तेव्हा त्यांना काय सांगायचं हेच कळतं नव्हतं. बरं सूचना करायची तरी कोणत्या भाषेत तेही समजतं नव्हतं. पण तरीही या जोडप्यांचे फोटो खूप सुंदर आले. दिल्लीची हातरिक्षा असो की राजस्थानचा किल्ला किंवा चिखलाने माखलेला रस्ता असो या प्रत्येक ठिकाणी भेट देत या दोघांनी भारतात आपले फोटो काढण्याची हौस पूर्ण करून घेतली. तेही भारतीय पद्धतीचा पारंपरिक पेहराव घालून हे विशेष. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि अनेकांना ते आवडतही आहेत.