दिल्ली पोलिसांनी एका कॅब ड्रायव्हरला मारहाण करुन त्याची कार लुटल्याप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींसह तीन जणांना अटक केली आहे, तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. दिल्ली पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. अटक केलेल्या आरोपींनी हरयाणातील प्रसिद्ध मुरथलचे पराठे खाण्यासाठी कॅब बूक केली होती. पण, रस्त्यात त्यांनी कॅबच्या चालकाला लुटलं, त्यानंतर आरोपींमध्येच भांडणाला सुरूवात झाली.
कॅब चालकाला लुटल्यानंतर आरोपींपैकी काही जणांनी मुरथलऐवजी शिमला जाण्याचं सुचवलं, त्यावरुन त्यांच्यात वाद सुरू झाला. अखेर सर्वांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये जेवण केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडण झाल्यानंतर आरोपींनी दिल्लीच्याच पश्चिम विहार परिसरातील हॉटेलमधून जेवण घेतलं आणि गाडीतच जेवण केलं. त्यानंतर गाडी निहाल विहार परिसरात एका ठिकाणी सोडून ते निघून गेले. अटक केलेले तीन आरोपी दिल्लीच्या नांगलोई परिसरातील असून तिघांपैकी दोन आरोपींवर आधीपासूनच दोन गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांच्यातील एकाने 30 ऑगस्ट रोजी मोबाइल फोन चोरी केला होता, त्या फोनमध्येच अॅप इंस्टॉल करुन त्यांनी कॅब बुक केली होती.
नांगलोई येथून नजफगढ रोडवर सर्व आरोपी कॅबमध्ये बसले. यानंतर पश्चिम दिल्लीच्या राजधानी पार्कजवळ पोहोचल्यानंतर पाचही आरोपींनी चालकाला माराहण केली. त्याचे दोन मोबाइल फोन, पैशांचं पाकिट घेऊन त्याला कारमधून धक्का देऊन बाहेर फेकलं. अटक केलेल्या तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला असून दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.