पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेबंरला ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यात. त्यानंतर आतापर्यंत बँकेत जमा झालेल्या या नोटांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार असे कुतूहल सगळ्यांच्या मनात जागे झाले आहे. पण, एका हिंदी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जमा झालेल्या या नोटांपैकी काही नोटांचा पुनर्वापर करुन त्यापासून हार्डबोर्ड बनवण्यात येणार आहे. यासाठी देशातील एकमेव हॉर्डबोर्ड बनवणा-या फॅक्टरीमध्ये नोटा पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : नोटाबंदीनंतर आग्रा येथील तरुणाच्या खात्यात जमा झाले १०० कोटी

नोटाबंदीच्या निर्णयानंतर तीन आठवड्यात बँकामध्ये आठ लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळत आहे. या नोटा चलनातून बाद झाल्याने त्या जाळून किंवा पुरून टाकण्यात येतील असेही रिझर्व्ह बँकेच्या अधिका-यांनी सांगितले होते. पण रिझर्व्ह बँकेच्या केरळमधल्या शाखेने या दोन्ही पर्याचा वापर न करता त्या हार्डबोर्ड बनवणा-या फॅक्टरीला पुनर्वापरासाठी देऊ केल्या आहेत.. कुन्नरमध्ये ‘द वेस्टर्न प्लाईवुड्स लिमिटेड’ ही देशातील एकमेव हार्डबोर्ड बनवणारी कंपनी आहे. या कंपनीला बँकेत जमा झालेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा आरबीआयने दिल्या आहेत. फॅक्टीरीमध्ये या जुन्या नोटांचे बारीक तुकडे केले जाणार आहे. त्यानंतर त्याचा लगदा बनवण्यात येईल. या नोटांचा लगदा आणि लाकडाचा लगदा एकत्र करून त्यापासून हार्डबोर्ड बनण्यात येणार असल्याचे समजते आहे.

‘द वेस्टर्न इंडिया प्लाईवुड्सचे लिमिटेड’चे व्यवस्थापकिय संपादक मयान मोहम्मद यांनी एनडीटीव्ही इंडियाला याबद्दलची माहिती दिली. ५०० आणि १००० च्या जून्या नोटांचे कागद हे कडक असून त्यांचा लगदा बनवण्यात अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले. पण योग्य रसायनांचा वापर करत त्यांनी कागदाचा लगदा बनवला असून त्यापासून हार्डबोर्ड बनवण्याच्या कामाला सुरूवात होईल असेही त्यांनी सांगितले. हा हार्डबोर्ड बनवण्यासाठी ९० टक्के लाकडाचा लगदा आणि १० टक्के जून्या नोटांचा लगदा वापरण्यात येणार आहे. गेल्या तीन आठवड्यात या कंपनीमध्ये ८० टन नोटांचे तुकडे करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक प्रत्येक वर्षाला चलन छापण्यासाठी ४० कोटी रूपये खर्च करते. त्यामुळे या नोटा जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर करण्याचा पर्याय आरबीआयच्या केरळ शाखेला सुचला आहे. नोटाबंदीच्या निर्यणानंतर ३१ डिसेंबरपर्यंत तब्बल २३०० कोटी नोटा जमा होतील असा दावा ‘ब्लूमबर्ग’ने केला आहे. या नोटा एकावर एक रचल्यास या नोटांच्या ढीगाची उंची माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच पर्वत शिखराच्या तिप्पट भरेल अशाही चर्चा होत्या.

वाचा : बँक व्यवस्थापकाने स्वत:च्या खिशातून अंत्यसंस्कारासाठी ग्राहकाला दिले पैसे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonetised bank notes get recycled in kerala report