करोना संकटामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित झाली असली तरी एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी मजेशीर कमेंट्स देत आहेत. एका हत्तीला क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यानेही आपल्या सोंडेत बॅट पकडून चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ३० सेकंदाचा हा व्हिडिओ ६ लाखांच्या वर नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

या व्हिडिओत हत्तीला बाद करण्यासाठी क्षेत्ररक्षण लावण्यात आलं आहे. मात्र गजराज गोलंदाजीचा अचूक टप्पा हेरून चेंडू मारत आहेत. हत्तीच्या क्रिकेट प्रेमामुळे नेटकरीही खूश झाले आहेत.

गन्नूप्रेम नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हत्तीसोबत खेळतानाचा आनंद इतरांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. गोलंदाजी करत त्याला बाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गजराजाला बाद करण्यास अपयशी ठरल्याचं दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी तर पुढच्या आयपीएलच्या लिलावासाठी गजराजाची निवड करावी अशी सूचनाही केली आहे.

भारतात क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे क्रिकेट सामने आणि त्याची चर्चा नाक्यानाक्यावर रंगताना दिसते. त्यामुळे हत्तीचं क्रिकेट प्रेम पाहून सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्ससह चर्चा रंगली आहे.