Ujjain Dol Gyaaras Procession Fire Stunt: उज्जैनच्या डोल ग्यारस मिरवणुकीत एक दुर्घटना घडली आहे. मिरवणुकीत एका गाडीवर उभ्या असलेल्या अतिउत्साही युवकांनी तोंडातून आगीचे लोळ काढण्याचा स्टंट केला होता. या स्टंटमुळे गाडीवर आग लागून काही तरूण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून आगीची भीषणता दिसून येत आहे. मिरवणुकीत उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ धाव घेत आगीच्या कचाट्यात सापडलेल्या तरूणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. आता गंभीर जखमी असलेल्या तीन युवकांवर उपचार सुरू आहेत.
प्रकरण काय आहे?
उज्जैनमध्ये बेरवा समाजाकडून दरवर्षी डोल ग्यारसच्या मुहूर्तावर शहरात मिरवणूक काढली जाते. रात्रीच्या वेळी मिरवणूक निघते. यात अनेक आखाडेही सहभागी होतात. आखड्यातील तरूण वेगवेगळ्या कसरती दाखवून लोकांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. मिरवणुकीत सहभागी होणारे आखाडे वेगवेगळ्या ठिकाणांहून निघतात आणि शहरातील टॉवर चौक येथे एकत्र येतात.
टॉवर चौकात आल्यानंतर मिरवणुकीतील सर्व गाड्या आणि लोक जुन्या शहरात प्रवेश करतात. या भव्य मिरवणुकीला पाहण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी असते.
आग कशी लागली?
मिरवणुकीत सहभागी असलेल्या एका ट्रकवरील मुले तोंडात पेट्रोल भरून हवेत आगीचे लोळ सोडण्याचा स्टंट करत होते. मात्र यावेळी आगीचा गोळा ट्रकवर उभ्या असलेल्या इतर तरूणांच्या अंगावरील कपड्यांना लागला आणि पाहता पाहता आगीने विक्राळ स्वरुप घेतले. आग लागल्यानंतर घाबरलेल्या युवकांनी गाडीच्या खाली उड्या मारल्या. तेव्हा तेथील लोकांनी त्यांच्या अंगावर पाणी फेकले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला.
आग विझवल्यानंतर जखमी युवकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, जखमी युवक ३५ टक्के भाजले आहेत. काहींची अवस्था अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जाते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.