एखाद्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आंदोलक अनेक पर्याय निवडतात म्हणजे बघा कोणी अन्नधान्य रस्त्यावर फेकून आंदोलन करतो, कोणी रस्तारोको, कोणी कामबंद करून निषेध व्यक्त करतं तर कोणी आणखी काय. ट्रम्प निवडून आल्यावर एक अमेरिकी महिलेने चक्क साडी नेसून ट्रम्पविरोधात आंदोलन केलं होतं, तेव्हा प्रत्येकाची निषेध व्यक्त करण्याची पद्धत निराळी आहे. कोण कसा निषेध करेल सांगता येत नाही, पण या महाशयाने आंदोलन करण्यासाठी असा पर्याय शोधला आहे ना की ते पाहून हसावं की रडावं असा प्रश्न तुम्हालाही पडेल. तर व्यवसायाने कलाकार असलेल्या या व्यक्तीने चक्क भरचौकात ३ तास भुंकून भुंकून निषेध व्यक्त केलाय. कारण काय तर सध्या फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि या महाशयांचा या पदासाठी असलेल्या दावेदार मरिन पेन्स यांना विरोध आहे, तेव्हा त्यांच्या विरोधात त्याने तीन तास भुंकून आपला विरोध दर्शवला आहे.
पॅरिसच्या एका प्रसिद्ध चौकात तो एकटाच भुंकत होता. काही तरी वेगळं केलं की लोकांच्या लक्षात राहतं असं त्याचं म्हणणं. मरिन पेन्सच्या उमेदवारीलाच त्याचा विरोध आहे, त्यांची भूमिका याला काही आवडत नाही. तेव्हा मतदारांनी जागरूक व्हावे यासाठी त्याने चक्क अशा प्रकारे आंदोलन केलंय. पण त्याचा फंडा पुरता फसला कारण आजूबाजूच्या लोकांनी त्याच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. वरून अनेकांनी तर कुत्राही त्याच्यापेक्षा चांगला भुंकतो अशी उपहासात्मक टीका त्याच्यावर केली. तेव्हा हा बिचारा एकटाच असाच भुंकत होता. शेवटी एकाच महिलेला काय ती या बिचाऱ्याची दया आली आणि ती त्याच्या या अजब आंदोलनात सहभागी झाली.
असा अजब प्रकार करण्याची त्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आता तरी याने भुकंण्यासाठी चौक निवडला. २०१४ मध्ये तर तो मतदान केंद्राच्या बाहेर उभा राहून भुंकत होता. मतदारांना त्याच्या भुंकण्याची एवढी डोकेदुखी झाली की ‘तू बाबा घरी जा पण असा भुंकू नको’ असं सांगण्याची वेळ आली होती.