मिशिलीअन स्टार शेफ गॉर्डन रॅमझेला काही म्हणायाचे तर ‘आ बैल मुझे मार’ करण्यासारखंच आहे. जितकं चविष्ट जेवण ते बनवतात तितकाच वाईट ते अपमानही करतात बरं का! त्याची अपमान करण्याची आणि आरडाओरडा करण्याची पद्धत इतकी वाईट आहे की भल्या भल्या लोकांच्या डोळ्यांतून आसवं गळू लागतात. चुकून माकून एखाद्या हॉटेलमध्ये रॅमझे गेले आणि तिथे काही चूक दिसली तर हॉटेल मालकापासून ते शेफ आणि इतर कर्मचारी मेलेच समजायचे. गॉर्डन रॅमझेचा एक शोही इंटरनेटवर तूफान हिट झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातल्या हॉटेल्स, रेस्टॉरन्टमध्ये तो जायचा आणि त्या हॉटेल्सचं असं काही परिक्षण करायचा की हॉटेलच्या मालकापासून ते शेफपर्यंत सारेच ‘गॅसवर’ असायचे. त्यामुळे गॉर्डन रॅमझेच्या दहशतीबद्दल वेगळं सांगायला नको. तेव्हा त्याच्या वाटेला जाण्याचा मुर्खपण सहसा कोणी करत नाही, कोण विकतचा अपमान करून घेणार म्हणा! पण मुंबईच्या एका मुलाने मात्र त्याच्या वाटेला जाण्याचा अतिशहाणपणा दाखवला आणि त्यावर रॅमझेचा असा काही रिप्लाय आला की नेटीझन्सना चर्चेसाठी नवा विषय मिळाला. या तरूणाने मेदू वडा सांबारचे फोटो ट्विट करत माझ्या या पाककृतीला गुणांकन द्या असे सांगितले. आता हा फोटो रॅमझेच्या ‘डोक्यात’ गेला नसेल तर नवलच. रॅमझेने ट्विट करत ” मला माहिती नव्हतं तू तुरूंगातून या पदार्थाचा फोटो शेअर केला आहेस” असे उपहासात्मक टि्वट करत मोजक्या शब्दात जास्तीत जास्त अपमान केला. असे इतरांचे अपमान करण्याची रॅमझेची काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकांनी आपापल्या पाककृतीचे फोटो त्याच्यासोबत शेअर करण्याचा अतिशहाणपणा दाखवला आणि त्यांचाही असाच अपमान रॅमझेने केला हे वेगळं सांगायला नको.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gordon ramsay epic replay on medu vada