निकाल त्यातही बोर्डाचा निकाल म्हटल्यावर विद्यार्थ्यांना गुणांचे आणि भविष्याची चिंता जरा जास्तच अधिक असते. दहावी आणि बारावीला मिळाले मार्कचं तुमचं भविष्य ठरवू शकतात असं अनेकदा मुलांना सांगितलं जात असल्याने त्यांना निकालाच्या कालावधीमध्ये मानसिक ताण येतो. मात्र या निकालांपेक्षा तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्यास काहीही अशक्य नाही असं सांगत या निकालांमुळे तण तणाव घेण्याची काही गरज नसल्याची पोस्ट अहमदाबादमधील एका आयएएस अधिकाऱ्याने केली आहे. या पोस्टमध्ये अधिकाऱ्याने स्वत:च्या १२ वीचा निकाल पोस्ट केला असून त्यामध्ये त्याला केवळ २४ मार्क असल्याचे दिसत आहे. सध्या ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

मुलांनी दहावी आणि बारावीच्या निकालाची जास्त चिंता करण्याची गरज नाही हे सांगण्यासाठी आयएएस अधिकारी असणाऱ्या नितीन सांगवान यांनी स्वत:च्या निकालाची प्रत ट्विटरवर पोस्ट केली आहे. २००२ सालातील परीक्षेचा हा निकाल असून यामध्ये नितीन हे केमिस्ट्री म्हणजेच रसायन शास्त्रामध्ये अगदी काठावर उत्तीर्ण झाल्याचे दिसत आहे. हा निकाल पोस्ट करताना तुमच्या गुणांवर फार काही अवलंबून नसतं कारण आयुष्यात या बोर्डाच्या निकालापेक्षाही महत्वाच्या गोष्टी आहेत, असं नितीन यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> पत्र पोहचवण्यासाठी रोज १५ किमी पायपीट करणारा पोस्टमन ३० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

“मला बारावीला केमिस्ट्रीमध्ये २४ गुण मिळाले होते. उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा अवघा एक गुण अधिक. मात्र त्यामुळे मी आयुष्यात काय करणार आहे यावर परिणाम झाला आहे. गुणांच्या तणावखाली झुकू नका. आयुष्यात बोर्डाच्या निकांपेक्षाही बरंच काही आहे. हे निकाल म्हणजे स्वत:मध्ये डोकावून पाहण्याची संधी असल्याचे समजा. स्वत:ला दोष देत बसू नका,” असं नितीन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> आलप्स पर्वतांमध्ये सापडली १९६६ ची भारतीय वृत्तपत्रं; मुखपृष्ठावर आहे इंदिरा गांधींबद्दलची बातमी

सीबीएसई निकालांच्या पार्श्वभूमीवर नितीन यांचे हे ट्विट व्हायरल झालं असून १२ हजार ९०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केलं असून ४९ हजारहून अधिक जणांनी ते लाइक केलं आहे.