Prayagraj News : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एक तरुण सौदी अरेबियामध्ये अडकला असल्याचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो तरुण पुन्हा भारतात येण्याची इच्छा व्यक्त करत असून मदत मिळण्यासाठी विनंती करत आहे. व्हिडीओमध्ये तो तरुण त्याला मदत मिळण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करत असल्याचं दिसत आहे.
इंद्रजित असं या तरुणाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. हा तरुण पैसे कमवण्यासाठी सौदी अरेबियाची राजधानी रियाध या ठिकाणी गेला होता असं सांगितलं जात आहे. मात्र, तिकडे गेल्यानंतर तो अडचणीत सापडला असून त्याला पुन्हा भारतात येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्याचा दावा तो करत आहे. यासाठी तो व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे त्याच्या घरी परतण्यासाठी मदतची विनंती करत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये त्या तरुणाने असाही आरोप केला आहे की त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सौदी अरेबियात ठेवण्यात आलं आहे. आता या व्हिडीओची भारतीय दूतावासाने दखल घेतली असून त्याचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
तरुणाने व्हिडीओत काय म्हटलं?
व्हिडीओमध्ये हा तरुण दावा करत आहे की त्याचा पासपोर्ट कपिल नावाच्या व्यक्तीने (कदाचित त्याचा मालक) घेतला आहे. त्यामुळे त्या तरुणाला परत भारतात येता येत नाहीये. त्यामुळे तो मदतीसाठी आवाहन करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मात्र, लोकसत्ता या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
व्हिडीओत काय दिसत आहे?
हा युवक वाळवंटात उंट सांभाळताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी तो त्याच्या मदतीसाठी व्हिडीओ बनवत असल्याचं दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ बनवताना तो रडत असल्याचंही दिसून येत आहे. त्या व्हिडीओमध्ये हा तरुण म्हणत आहे की, “माझं गाव अलाहाबादमध्ये आहे. मी सौदी अरेबियाला आलो होतो, कपिलकडे माझा पासपोर्ट आहे. मी त्याला घरी जायचं असं सांगितलं, पण तो मला धमकी देत आहे.”
“हा व्हिडीओ इतका शेअर करा की, तुमच्या भारतातील पाठिंब्याने मला मदत मिळू शकेल आणि मी भारतात परत येऊ शकेन. तुम्ही मुस्लिम, हिंदू किंवा कोणीही असाल तरी तुम्ही कृपया मदत करा. नाही तर मी इथेच मरून जाईन. मला माझ्या आईकडे जायचं आहे. हा व्हिडीओ इतका शेअर करा की तो पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल”, असं तो तरुण व्हिडीओत म्हणत आहे.
माननीय विदेश मंत्री @DrSJaishankar जी तत्काल संज्ञान मे ले, प्रयागराज हंडिया प्रतापपुर का रहने वाला फंसा सऊदी अरब मे…
— कल्पना श्रीवास्तव ?? (@Lawyer_Kalpana) October 23, 2025
पार्ट 1 सभी भाई बहन इस वीडियो को शेयर करें ताकि इसकी सहायता हो पाए ? pic.twitter.com/5op97otITq
सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने काय म्हटलं?
या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने सांगितलं की ते त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या तरुणाचे दावे निराधार असल्याची चर्चाही सोशल मीडियावर असून फॉलोअर्स वाढवण्याच्या उद्देशाने असे व्हिडीओ व्हायरल केले जात असल्याचंही बोललं जात आहे.
