आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. नोकरी मिळाली तर ती टिकवणं हेही एक आव्हान असतं. नोकरी मिळविण्यासाठी अनेकजण मेहनत घेत असतात. तर काही जण शॉर्टकट वापरून पगार वाढवून घेण्याच्या प्रयत्नात होतकरू उमेदवाराची जागा बळकवतात. अर्शिया कौर नामक एका व्यावसायिक तरूणीनं तिच्या कंपनीतील असाच एक धक्कादायक किस्सा इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अर्शिया कौर किस्सा सांगताना म्हणते, “मला नेहमी वाटतं की, यापेक्षा आणखी काही वाईट पाहायला मिळणार नाही आणि नेमकं तेव्हाच आधीपेक्षा वाईट घटना घडते.”
अर्शिया कौरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले की, तिने २०२४ मध्ये तिच्या कंपनीत मार्केटिंग हेड या पदासाठी एका व्यक्तीला कामावर घेतलं. कागदोपत्री तो व्यक्ती उत्तम होता. त्यानं त्याचा सीव्ही सादर केला, तसंच आधीच्या संस्थेच्या प्रगतीत त्याचे योगदान कसं होते, याचं चांगले प्रेझेंटेशन दिलं.
अर्शिया पुढे म्हणाली, “सर्वकाही रितसर योग्य मार्गाने होत आहे, असं मला वाटलं. त्यामुळं आम्ही त्या व्यक्तीला कामावर घेतलं. पण पहिल्याच महिन्यात आम्हाला संशय यायला लागला. हा व्यक्ती वरिष्ठांशी आणि त्याच्या सहकाऱ्यांशी धड नीटपणे बोलूही शकत नव्हता. तसंच त्याच्या जबाबदाऱ्याही त्याला पार पाडता येत नव्हत्या. त्याची सर्व कामं इतरांना देण्यात आली किंवा आम्हाला स्वतःलाच करावी लागत होती.”
आम्ही टीममधील अनेक सहकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर अडीच महिन्यातच त्याची हकालपट्टी केली. त्याला काढून टाकल्यानंतर नेमकं काय चुकलं याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. मग आम्ही सर्व कागदपत्रं पुन्हा तपासली. तेव्हा आम्हाला समजलं की, त्यानं खोट्या सॅलरी स्लीप सादर केल्या होत्या, असे अर्शियाने शेअर केलेल्या व्हिडीओत सांगितले.
कर्मचाऱ्यानं कसं मूर्ख बनवलं
अर्शिया म्हणाली की, एचआर टीम किंवा आम्ही सॅलरी स्लीप तेवढ्या बारकाईनं पाहत नाहीत, कारण आजवर सॅलरी स्लीपमध्ये कुणी लबाडी केलेली नाही. कारण हा गुन्हा मानला जातो. त्यानं सादर केलेल्या सॅलरी स्लीपनुसार तो महिन्याचे ३१ पैकी ३१ दिवस एकही दिवस सुट्टी न घेता काम करत होता. तसंच स्लीपवर कंपनीचा शिक्का किंवा स्वाक्षरी नव्हती. तसेच कर कापल्याची माहिती नव्हती. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सदर स्लीप एक्सलमध्ये तयार करण्यात आली होती.
आम्ही जेव्हा कर्मचाऱ्याला कामावरून काढताना त्याचे पूर्वीच्या संस्थेच्या पगाराचं बँक स्टेटमेंट दाखविण्यास सांगितलं, तेव्हा त्यानं आम्हाला अजब कारण दिलं. त्यानं सांगितलं की, त्याची पूर्वीची संस्था त्याला वेतनातील मोठा वाटा रोखीतून देत होते.
अर्शियाने पुढं म्हटलं की, हा आम्हाला धडा शिकवणारा प्रसंग होता. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला मोठ्या पगारावर कामावर ठेवतो, तेव्हा त्याला दिला जाणारा प्रत्येक एक पैसा महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कामाला ठेवताना इतर कंपन्यानी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.