२१ व्या शतकात महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्यातील गुणवत्ता दाखवून देत आहेत. महिलांना या पुरुषांसोबत काम करत असल्या तरी अवजड कामे त्या करु शकत नाहीत असे सर्रास बोलले जाते. पण महिला अवजड कामे करण्यातही समर्थ असल्याचे दिल्लीतील एका महिलेने दाखवून दिले आहे. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही शांती देवी कोणत्याही थकव्याशिवाय १२ तास ट्रक दुरुस्तीचे काम करत आहेत. दिल्लीतील महामार्ग क्रमाक ४ वर संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरच्या ट्रक डेपोमध्ये ही महिला कार्यरत आहे. तब्बल बारा तास मेहनतीच्या काम करणाऱ्या शांती देवींना त्या देशातील पहिल्या महिला मॅकेनिक आहेत याची कल्पना देखील नाही.

 

शांती देवी काम करत असणाऱ्या वर्कशॉपजवळ चहाची टपरी देखील चालवतात.चहाच्या व्यवसायामध्ये त्याचे पती रामबहादूर त्यांना मदत करतो. शांती देवी आपल्या पतीसोबत गेल्या २० वर्षापासून दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच ते आपल्या कामातुन संतुष्ट देखील आहेत. शांती देवी यांना आठ मुले आहेत.

मुळची मध्य प्रदेशच्या शांती देवी यांनी गल्फ वृत्तवाहिनीला काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती. यावेळी त्यानी अवजड वाहनाचे काम करणे कठीण असले तरी ते त्रासदायक कधीच वाटत नसल्याचे प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. पन्नाशीमध्ये अवजड वाहनाला मार्गी लावण्याच्या कामाचा मला कंटाळा येत नाही, पण काम नसेल तर नक्कीच कंटाळून जाईल असेही त्या म्हणाल्या आहेत.

काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर यांनी शांती देवींची प्रशंसा केली होती. महिलांना कोणती कामे करावी, या बंधनात न राहता शांती देवी कौतुकास्पद काम करत असल्याचे कौर यांनी म्हटले होते. लैंगिक भेदभाव दुर करण्यासाठी देशाला शांती देवीसारख्या महिलांची गरज असल्याचे ट्विट देखील कौर यांनी केले होते.