सोशल मीडियावर सतत कुठले ना कुठले फोटो आणि व्हिडीओज व्हायरल होत असतात. या फोटोंवर जगभरातील नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देतात. परिणामी तो फोटो किंवा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये येतो. असाच एक चकित करणारा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा फोटो आहे गुरू ग्रहाचा.

गुरु हा आपल्या सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. या ग्रहाचा पृष्ठभाग कसा दिसतो? हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी लर्न समथिंग या ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो पोस्ट करण्यात आला. या फोटोमध्ये गुरु ग्रह अगदी दाक्षिणात्य पदार्थ डोस्यासारखा दिसत आहे. परिणामी अनेकांनी गुरु ग्रहाची तुलना डोसासोबत केली आहे.

गुरू (Jupiter) हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना “जोव्हियन प्लॅनेट्स” ( jovian planets) असेसुद्धा म्हटले जाते. गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनला आहे. त्याला इतर जड मूलद्रव्यांचा उच्च दाबाखालील खडकाळ गाभा असणे शक्य आहे. गुरूच्या जलद परिवलनामुळे त्याचा आकार गोलाकार न राहता विषुववृत्तावर थोडासा पण जाणवण्याइतका फुगलेला आहे. गुरूचे बाह्य वातावरण वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये विभागलेले आहे. यामुळे या विभागांच्या सीमा रेषांवर मोठी वादळे होत असतात. याचा परिणाम म्हणजे गुरूवर दिसणारा प्रचंड लाल डाग. वास्तविकरीत्या हा डाग म्हणजे सतराव्या शतकापासून चालत आलेले एक मोठे वादळ आहे. गुरूच्या भोवती एक अंधुक कडा आहे व शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता. त्यांना गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. गॅनिमिड हा यापैकी सर्वांत मोठा उपग्रह असून त्याचा व्यास बुध ग्रहापेक्षाही जास्त आहे.