जम्मू-काश्मिरला पृथ्वीवरील ‘जन्नत’ म्हणूनही ओळखलं जातं. या ‘जन्नत’मध्ये असलेलं सुप्रसिद्ध दल सरोवर (Dal Lake) पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. जम्मू काश्मिरमध्ये गेलेले पर्यटक दल सरोवराला आवर्जून भेट देतात. मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे बोटिंगसाठी येत असतात. पण, या सुंदर सरोवरामध्ये घाणही तितकीच होते. मात्र एका सात वर्षाच्या चिमुकलीने हे सरोवर साफ करण्याचा विडा उचलला आहे. दोन वर्षांपासून ही चिमुकली हे सरोवर स्वच्छ करतेय. विशेष म्हणजे या चिमुकलीचं नावंही ‘जन्नत’ आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दोन वर्षांपासून दल सरोवराची साफसफाई करणाऱ्या जन्नतच्या याच कार्याचा उल्लेख आता पाठ्यपुस्तकामध्येही करण्यात आला आहे. दल सरोवराची साफसफाई करणाऱ्या जन्नतची गोष्ट पाठ्यपुस्तकात प्रकाशित करण्यात आली आहे. हैदराबादच्या शालेय अभ्यासक्रमात तिच्या कार्याचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत बोलताना, “माझ्या वडिलांकडून मला हे सरोवर साफ करण्याची प्रेरणा मिळाली. मला जी ओळख मिळतेय ती फक्त माझ्या माझ्या वडिलांमुळेच आहे”, असं जन्नतने सांगितलं. तर, “मला हैदराबादमधील माझ्या एका मित्राचा फोन आला आणि माझ्या मुलीच्या कार्याचा उल्लेख शाळेच्या अभ्यासक्रमात करण्यात आल्याचं त्याने मला सांगितलं. मी त्याला त्याची एक प्रत पाठवायला सांगितली आहे. माझ्यासाठी तो अभिमानाचा क्षण होता”, अशी प्रतिक्रिया जन्नतचे पिता तारिक अहमद यांनी दिली.


दोन वर्षांपासून ‘जन्नत’ दररोज आपल्या वडिलांसोबत छोट्याशा बोटीमध्ये जावून दल सरोवराची साफसफाई करतेय. तिच्या या कार्याचं आता सोशल मीडियावरुनही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.