Kanpur Viral VIDEO : समाजमाध्यमांवर जास्तीत जास्त लाइक्स मिळावेत, व्ह्यूज व सब्स्क्रायबर्स मिळावेत यासाठी कॉन्टेंट क्रिएटर्स वाट्टेल ते करताना दिसतात. अनेकजण पातळी सोडतात, तर काहीजण जीवघेणी स्टंटबाजी देखील करतात. उत्तर प्रदेशमधील एका युट्युबरने असाच प्रकार केला आहे. ज्यामुळे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कानपूरमधील एका युट्यूबरने उड्डाणपुलावर उभा राहून नोटांचा वर्षाव केला. कानपूरमधील चकेरी येथील ही घटना असून पोलिसांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंर युट्यूबरला ताब्यात घेतलं आहे. उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावर अचानक नोटा पडू लागल्या. या नोटांचा पाऊस पाहून ते पैसे गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की एक तरुण उड्डाणपुलावर उभा राहून २०० रुपयांच्या नोटा उडवतोय. या नोटा उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावर पडत आहेत आणि लोक त्या नोटा जमा करण्यासाठी एकच गर्दी करतायत. समाजमाध्यमांवर या तरुणाचं नाव जैद हिंदुस्तानी असं आहे. या घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार या तरुणाला त्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचा होता. हा वाढदिवस कायम लक्षात राहिल असं काहीतरी करावं म्हणून त्याने हा प्रताप केला. यासाठी त्याने ५०,००० रुपये उधळले.

हा तरुण पैसे उधळत असताना त्याचे काही साथीदारही उड्डाणपुलावर उभे होते. त्यांनी देखील काही पैसे उधळले. हे तरुण पैसे उधळत असताना उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या लोकांनी मोठा गोंधळ केला. लोक पैसे गोळा करत होते. एका बाजूला लोक पैसे गोळा करत होते तर काहीजण या घटनेचा व्हिडीओ चित्रित करत होते.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या युट्यूबरचा शोध सुरू केला. पोलीस म्हणाले, “सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे नोटा उधळणे कायद्याने गुन्हा आहे. कारण, यामुळे वाहतूक प्रभावित होते. अपघात होण्याची, लोकांमध्ये हाणामारी, चेंगराचेंगरी होण्याची देखील शक्यता असते. यामुळे मोठी दुर्घटना देखील घडू शकते. कानपूर पोलिसांनी या घटनेची दखल घेत सदर आरोपीस ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanpur youtuber booked for throwing 200 notes worth 50000 rupees from flyover booked asc