करवा चौथ हा सण सर्व विवाहित स्त्रियांसाठी खूप खास असतो. लग्नानंतर सुवासिनी हा सण साजरा करतात. पती-पत्नीच्या नात्याला आणखी दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे व्रत महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत केले जाते. फक्त लग्न झालेल्या महिलाच नाही, तर अविवाहीत मुलीदेखील हे व्रत करतात.
टीम इंडियातील एका क्रिकेटपटूची पत्नीदेखील लग्नाआधीपासूनच हे व्रत करायची. त्या खेळाडूची पत्नीने स्वत: याबद्दल माहिती दिली. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या पत्नीने एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत हे गुपित उघड केले. लहानपणापासून करवा चौथ हे व्रत मला आवडायचे. मी लग्नाआधीपासून, अगदी लहानपणापासून हे व्रत करायचे, असे हरभजनची पत्नी अभिनेत्री गीता बसरा हिने सांगितले.
जेव्हा मी लहान होते, तेव्हापासून मला हा सण आवडतो. ज्या ज्या वेळी मी टीव्हीवर, सिनेमात अभिनेत्री किंवा तिची आई घरी हे व्रत करताना पाहायचे; तेव्हा मला त्या गोष्टीचे र अप्रूप वाटायचे. तो विशिष्ट भाग पाहताना आपणही ते व्रत करावे,अशी ईच्छा मला व्हायची. म्हणूनच लग्नाच्या आधीदेखील मी करवा चौथचे व्रत करायचे, असं गीताने सांगितलं.
माझं लग्न २९ ऑक्टोबर २०१५ ला झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी करवा चौथचा सण होता. त्याबद्दल मी खूपच उत्सुक होते. या सणासाठी मी आणि हरभजनने छान तयारी केली आणि आम्ही सोबत पूजा केली. आतापर्यंतचा तो माझा सगळ्यात स्पेशल सण होता, असेही गीता म्हणाली.