तुम्ही कधी रात्री लाँग ड्राईव्हला बाहेर पडला आहात का ? समजा तुम्ही कधी रात्री तुमची गाडी घेऊन फिरायला निघालात आणि रस्त्यात तुम्हाला सिंहांचे दर्शन घडले तर…? गुजरातमध्ये रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या काहीजणांना साक्षात सिंहांचे दर्शन घडले आहे. जुनागढमध्ये चित्रीत करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

रात्रीच्या वेळी मोबाईलमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये दोन सिंह एका अंधार असलेल्या रस्त्यावरुन चालताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे सिंह मानवी वस्तीत अगदी बिनधास्तपणे फिरत आहेत. जवळपास सव्वा मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये दोन सिंह आहेत. यातील एक सिंह अवघ्या काही सेकंदांमध्ये निघून जातो. मात्र दुसरा सिंह हळूहळू पहिल्या सिंहाच्या मागे चालताना दिसतो. एका कारमधून हा संपूर्ण व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे.

जुनागढ परिसर गिर राष्ट्रीय उद्यानाजवळ येतो. आशियाई सिंहांसाठी ओळखले जाणारे गिर राष्ट्रीय उद्यान जुनागढपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या भागात नेहमीच सिंहांचा मुक्त वावर पाहायला मिळतो. याआधीही या भागात जुलै महिन्यात सिंहांचा असाच मुक्त संचार पाहायला मिळाला होता.