Viral Post : सोशल मीडियावर दररोज एखादा फोटो, व्हिडीओ किंवा पोस्ट व्हायरल होत असते. यादरम्यान नुकतेच गुरूग्राम येथील एका तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची पोस्ट चर्चेत आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिट (Reddit) वर केलेल्या या पोस्टमुळे चांगला पगार की काम आणि वैयक्तिक आयुष्याचे संतलन? दोन्हीपैकी काय जास्त महत्त्वाचे? यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
या युजरने पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्याने बंगळूरू येथील ४५ लाख रूपयांची नोकरीची ऑफर नाकारली. अपेक्षित कामाचा ताण आणि राहण्याचं ठिकाण बदलावे लागेल यामुळे त्याने ही ऑफर स्वीकारली नाही. पण आता या युजरला त्याच्या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याचे त्याने म्हटले आहे.
“मला नोकरीच्या दोन ऑफर मिळाल्या आहेत, त्यापैकी एक एमएनसीकडून ३८ लाख रुपये प्रति वर्ष साठी आणि दुसरी भारतातील एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून ४५ लाख रुपये प्रति वर्षासाठी आहे,” असे त्या युजरने r/developersIndia नावाच्या सब-रेडिट लिहिले.
पण मला सध्याच्या गुरूग्राम या ठिकाणाहून बंगळुरूला जावे लागत होते आणि तेथे कामाचा ताण खूप जास्त होता. मी त्यांना नकार दिला आणि आता मला अपराधीपणा वाटत आहे. मी पैसा निवडावा की स्थिरता.”
या वापरकर्त्याने कशा पद्धतीने त्याचे करियर वाढत गेले याबद्दलही माहिती दिली आहे. सुरुवातीला एका सर्व्हिस-बेस्ड मल्टीनॅशनल कंपनीत ३.८ लाख रुपये प्रति वर्षाच्या पॅकेजने त्याने सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तीन वेळा धोरणात्मक पद्धतीने नोकरी बदलली, ज्यामुळे त्याची सध्याचा वार्षिक पगार वाढून ३८ लाख रुपये झाला.
या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडिया वापरकर्ते यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत, ज्यापैकी बहुतेक जण हे या व्याक्तीला ऑफर नाकारल्याबद्दल काळजी न करण्याचा आणि आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत आहेत.
मला वाटते की एका ठराविक एलपीएनंतर, नोकरीची ऑफर निवडताना वर्क कल्चर आणि काम-वैयक्तिक आयुष्याचे संतुलन अधिक महत्त्वाची भूमिका बजावते, असे एका युजरने म्हटले. तर दुसरा म्हणाला की, “आपण आनंदी आयुष्यासाठी पैसे कमावतो, फक्त एवढं लक्षात असू दे.”
तिसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया दिली की, “३८ लाख ही रक्कम तसंही खूप मोठी आहे. त्यामुळे जास्त कामाच्या ताणाऐवजी शांततेची निवड करून तू योग्य निर्णय घेतला आहेस. तुला ५० साठी प्रयत्न करण्याची दुसरी संधी पुढच्या वर्षी मिळेल.”