सेल्फीचे वेड लोकांना काय करायला लावेल हे सांगता येत नाही. इराकच्या मोसुल शहरात इसिस विरुद्ध कुर्दी सैन्य असे युद्ध सुरू आहे. अशातच जीवाची पर्वा न करता पेटलेल्या तेलाच्या विहीरीजवळ एका व्यक्तीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. हा सेल्फी सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एकिकडे इसिसने इराकचे मोसुल शहर ताब्यात घेऊन तिकडे उच्छाद मांडला आहे. जोपर्यंत मोसुल ताब्यात येत नाही तोपर्यंत इसिसचा पाडाव करणे शक्य नाही. त्यामुळे कुर्दी आणि तुर्की सेना पुन्हा एकदा मोसुल ताब्यात घेण्यासाठी प्राणानिशी लढत आहे. अशातच सैन्याच्या ड्रोन आणि विमानांना आपण नजरेत पडू नये यासाठी इराकी सैन्याने तेलाची विहीर पेटवून दिली. तेलाने पेट घेतल्यावर सगळीकडेच धूर पसरला होता पण असे असताना मात्र एका व्यक्तीने या पेटलेल्या विहीरीच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. युद्ध सुरू आहे यात आपला जीव जाऊ शकतो याची जराही पर्वा नकरता अगदी निश्चित होऊन हा माणूस सेल्फी घेत होता म्हणूनच कदाचित हा सेल्फी व्हायरल होत असेल. पण फोटोत असणारी ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजू शकले नाही. स्थानिक नागरीक किंवा इसिसचाचा दहशतवादी असू शकतो. कदाचित युद्धाची सवय झाल्यामुळे हा बेफिकिरपणे सेल्फी काढत असेल.
सेल्फीचे वेड असलेला हा पहिलच नाही. याआधीही देखील जीव धोक्यात घालून सेल्फी काढणा-या अनेक महामुर्खांची चर्चा सोशल मीडियावर होतच असते. काही दिवसांपूर्वी  राजस्थानमधल्या माऊंट अबु येथे एका युवकाने अजगरासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होता. सेल्फी काढण्यासाठी तो अजगराच्या इतक्या जवळ गेला की अजगराने त्याचा चावा घेतला होता.