‘मिस साऊथ आफ्रिका’ हा किताब पटकावणाऱ्या डेमी पिर्टर्स ‘Demi-Leigh Nel-Peters ‘ वर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आफ्रितल्या गरीब मुलांची भेट घेतली. त्यांना जेवण भरवताना तिने आपल्या हातात हँड ग्लोव्हज घातले होते. ज्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ती खरंच गरीब मुलांना भेटायला आली की हा फक्त दिखावा होता असा प्रश्न तिला विचारला जात आहे. अनेक सेलिब्रिटी आफ्रिकेतल्या लहान मुलांना काही स्वयंसेवी संस्थांमार्फत आर्थिक मदत पुरवत असतात. काही सेलिब्रिटी स्वत: तिथे जाऊन या मुलांची भेट घेतात. त्यांच्यासोबत वेळ घालवतात. त्यांचे प्रश्न, समस्या समजून घेतात. लोकांपर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवतात.

तेव्हा या कार्याचा भाग म्हणून डेमीने जोहान्सबर्ग Johannesburg इथल्या गरीब मुलांची भेट घेतली होती. यात एचआयव्हीग्रस्त लहान मुलंही होती. यावेळी ती हँडग्लोव्हज घालून प्रत्येक मुलांशी हस्तांदोलन करत होती. मुलांना भरवताना देखील तिने हँड ग्लोव्हज काढले नव्हते. तेव्हा तिच्या अशा वागण्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तिचं वागणं वंशविद्वेषी आहे असंही अनेकांचं म्हणणं होतं. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिच्यावर टीका केल्यानंतर डेमीने एक व्हिडिओ अपलोड केलाय. मुलांसाठी मी जेवण बनवत होते आणि स्वच्छता म्हणून मी हातात ग्लोव्हज घातले होते असं तिने व्हिडिओमध्ये सांगितलंय. ‘अनेकजण जेवण बनवताना हातात ग्लोव्हज घालतात तसे मीही घातले तेव्हा चुकीचा निष्कर्ष काढून मला वंशविद्वेषी ठरवू नये’ अशी विनंती तिने केलीय. पण तिचा खोटारडेपणाही अनेकांनी ट्विटमधून उघड केलाय. एका टि्वटर अकाऊंटवरून तिचे काही जुने फोटोही ट्विट करण्यात आलेत. त्यातल्या एका फोटोमध्ये ती किचनमध्ये काम करताना दिसत होती तेव्हा तिने ग्लोव्हज घातले नव्हते, अगदी कुत्र्यांशी खेळताना देखील तिने ग्लोव्हज घातले नव्हते, मग तेव्हा तिला हायजीनची काळजी नव्हती का, अशी उलट विचारणा तिला करण्यात येत आहे.