लहान मुलं नकळत मोठ्यांच्या अनेक गोष्टींचं अनुकरण करत असतात. ते कसं वागतात, बोलतात एकूण एक गोष्टींकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. या सगळ्या गोष्टी ते पटकन आत्मसात करतात. कोणती गोष्ट चूक किंवा कोणती गोष्ट बरोबर यातील फरक ओळखण्याचं त्यांचं वय नसतं, म्हणूनच त्यांच्यासमोर वागताना काळजी घेणं आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या बाबतीतही इंग्लडमधल्या या महिलेसारखा प्रसंग घडू शकतो. आई काहीतरी सूचना देऊन खूप खरेदी करते, हे जेव्हा पाच वर्षांच्या मुलीच्या लक्षात आलं, त्यावेळी आईच्या नकळत तिनं जवळपास २५ हजारांची खरेदी केली. घरी भलंमोठं बिल आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
Video : एका मिनिटात त्याने हाताने फोडले २१२ अक्रोड
इंग्डलमध्ये राहणारी सोफी स्टोन ही महिला अॅमेझॉन फायर टॅबलेट वापरून वस्तू खरेदी करायची. यात तुम्हाला ज्या वस्तू हव्यात त्याची सूचना द्यायची. ही संपूर्ण प्रणाली आवाजावर चालते. आई वस्तू मागवताना कशाप्रकारे बोलते? काय सूचना करते? हे सगळं तिच्या पाच वर्षांच्या मुलीनं लक्षात घेतलं. घरी जेव्हा कोणीच उपस्थित नव्हतं तेव्हा आईसाठी हिऱ्यांचा नेकलेस, स्वत:साठी खेळणं आणि बरंच काही तिनं मागवलं होतं. मुलीच्या या खरेदीची आईला कल्पनाच नव्हती, पण जेव्हा भलंमोठं बिल सोफीच्या घरी पोहोचलं त्यावेळी मात्र तिला धक्काच बसला.
अशी वेळ कोणावरही येऊ शकते त्यामुळे मुलांसमोर एखादी गोष्ट करताना दक्षता घ्या, अशी विनंती सोफीनं केली आहे.
व्हायरल होत असलेला ‘हा’ व्हिडिओ दादर स्टेशनवरचा नव्हेच!