Marathi Charolya & Poems For Mothers : आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती. तिचे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्व व स्थान हे अनन्यसाधारण आहे. आई आपल्या लेकराच्या सुखासाठी वाट्टेल ते करते. आईचे प्रेम हे कधीही मोजता येत नाही. या आईविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मदर्स डे जगभरात साजरा केला जातो. या दिवशी मुले आपल्या आईला भेटवस्तू देत व वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत मदर्स डे साजरा करतात. तुम्ही आईला सुंदर चारोळ्या किंवा कविता पाठवून हटक्या पद्धतीने मदर्स डेच्या शुभेच्छा देऊ शकता किंवा तुम्ही आईसाठी ग्रीटिंग्स तयार करत असाल तर या चारोळ्या किंवा कविता त्यावर लिहू शकता.

चारोळ्या

१. आई सुखाची सावली
आई मायेचा सागर
निळ्या आकाशाएवढा
तिचा मायेचा पदर

२. आईच्या डोळ्यात, जगाची ओढ,
आईच्या स्पर्शात, जीवनाला जोड.
आईच्या हातात, स्वप्नांची वाट,
आईच्या मायेत, जीवनाला साथ.

३. आईच्या कुशीत, सुखद दिवस,
आईच्या प्रेमात, जग सुंदर दिस.
आईच्या हातात, जीवनाचा आधार,
आईच्या मायेत, प्रेम भरपूर

४. आईच्या डोळ्यात, जगाची ओढ,
आईच्या स्पर्शात, जीवनाला जोड.
आईच्या हातात, स्वप्नांची वाट,
आईच्या मायेत, जीवनाला साथ.

५. काळजाची हाक असते आई,
निःशब्द जाग असते आई..
अंतरीचे गूढ असते आई,
ईश्वराचे रूप असते आई…

६. कोठेही न मागता,
भरभरुन मिळालेलं दान, म्हणजे आई…
विधात्याच्या कृपेचं,
निर्भेळ वरदान, म्हणजे आई…

७. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी

…………………………….

कविता

१. आई म्हणोनी कोणी

’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

कवी – यशवंत

२. आई मुलाचा संवाद

धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आल
वस्तूंची फेकाफेक करत घरामध्ये गेलं
तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती
आई अशीच देवासमोर दिवा लावत होती
जगासमोर जे चाललं नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं
बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं
म्हणाला खोटारडी आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस
आजपर्यंत तु माझ्याशी खोटंच बोललीस
आशीर्वाद देताना काय म्हणतेस ? की माझं काहीच अडणार नाही
माझ्या बाबतीत कधीच मुळी वाईट काही घडणार नाही ?
आईपासून काय लपतय? तिच्या लक्षात आलं
तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं
हुदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं
आई म्हणाली आता सांग तुला काय झालं ?
तो म्हणाला आई लोक विचित्र झालेत फार
सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार
त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात
जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात
बरं माझ्याविषयी माझ्यामाघारी बोलतात लोकांजवळ
मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ?
बरं वाईट याच वाटत की या लोकांचा एकसंघ झालाय
मी वाईट वागत नसून मला यांनी बाजूला केलाय
आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला
मी तुला काय झालं? विचारले तू त्यांचा त्रास सांगितला
सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसताहेत का हसताहेत?
कारण तुला पूर्ण करायची स्वप्नही तुला तुझ्याच डोळ्यांना दिसताहेत
त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहताहेत ती सर्व स्वप्ने खोटी कर
दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू तुझी रेघ मोठी कर
आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही
आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही
आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला
आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला
तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला..

कवी – संकर्षण कऱ्हाडे

३. माझी आई

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंडय़ा जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मज्जा म्हणून सांगू
शब्दसाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.

कवी – नारायण सुर्वे

४. माझी मायं

हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी
दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या
व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे
आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून
पाजत जाय
तवा मले पिठामंदी
दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला
माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या
फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं
नसे पाय
तवा मले काट्यामंदी
दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी
मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता
घेऊ दे हाती काम
शिकुनश्‍यानं कुठं मोठ्ठा
मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी
दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी
जवा माझा बाप
थरथर कापे आन
लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला
बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी
दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा
तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी
कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील
दुधावरची साय
तवा मले सायीमंदी
दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं
भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा
तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया
धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय

कवी – स. द. पाचपोळ