पत्रकाराचं आयुष्य धोका आणि जोखमीने भरलेलं असतं. अनेकदा जीव धोक्यात घालून त्यांना बातमीचं वार्तांकन करावं लागतं. त्यातही युध्दपत्रकारांचं काम आणखी जोखमीचं असतं. सगळीकडून गोळ्या सुटत आहेत, बाॅम्ब फुटत आहेत, सैनिक सामान्य नागरिकांची धरपकड करत आहेत अशा भीषण परिस्थितीत त्यांना न्यूज कव्हर करावी लागते. यावेळी त्यांच्या प्राणांचीही काहीच शाश्वती नसते.
त्याचप्रमाणे एखादी बातमी करताना पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता या भूमिकांमधली रेषा पुसट होत जाते. एखाद्या ठिकाणची बातमी कव्हर करत असताना त्या परिस्थितीत सापडलेल्या माणसांची मदत करायला तिथे कोणीही नसतं अशा वेळेस ‘माझं काम फक्त बातमी देण्याचंही आहे’ असा विचार करत त्या संकटात सापडलेल्या त्या व्यक्तीच्या तसंच टाकून पुढे जाणं हे अनेकदा अशक्य असतं
सीरियामधल्या एका फोटोग्राफरच्या बाबतीतहा असाच प्रकार घ़डला सीरियातलं युध्द कव्हर करत असताना काही जखमी मुलांना त्याने कॅमेरा बाजूला ठेवत मदत केली. या पत्रकाराचं नाव आहे अब्द अल्कदर अबाक.
पश्चिम आशियामधल्या सीरियातलं युध्द सुरू होऊन सहा वर्ष झाली आहेत. आतापर्यंत लाखो निरपराध नागरिकांचा बळी घेणारं हे युध्द थांबण्याचं नाव घेत नाहीये.
हबाक सीरीयातल्या एका शहरामध्ये युध्दाचे फोटो काढत होता. त्यावेळी तिथे शहरातल्या नागरिकांना अन्नपुरवठा करणारा एक ट्रक आला. भुकेने बेजार झालेल्या त्या शहरातल्या मुलांनी या ट्रककडे धाव घेतली आणि ही मुलं त्या ट्रककडे पोहोचतात न पोहोचतात, त्या ट्रकचा स्फोट झाला. या भीषण स्फोटामध्ये त्या ट्रकभोवती जमलेल्या ६० मुलांपैकी अनेक जण मृत्युमुखी पडली आणि काही मुलं जखमी झाली. या मुलांचा फोटो काढण्यासाठी त्या ट्कच्या जवळ गेलेला हबाकसुध्दा त्या स्फोटामुळे बेशुध्द पडला. हबाक शुध्दीवर आल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याच्या बाजूला त्या स्फोटात जखमी झालेली अनेक मुलं दिसली. स्वत:च्या जखमींकडे न पाहता आणि आपल्या प्रकृतीचा विचार न करता आणि फोटोचा नाद सोडत त्याने एका जखमी मुलाला उचललं आणि जवळच्या अँब्युलन्समध्ये ठेवलं. या मुलाला हबाक घेऊन जात असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा मुलाचे प्राण वाचावेत यासाठी त्याची तळमळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.
पत्रकाराचं किंवा फोटोग्राफरचं काम असतं ते बातम्या देणं. त्या ठिकाणच्या प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये जाऊन ती बदलण्याचा प्रयत्न करण याचं बंधनं काही त्या पत्रकारावर नसतं. पण ही परिस्थिती वेगळी होती. कितीतरी लहानग्यांच्या जिवाचा हा प्रश्न होता. त्यावेळी मानवतेच्या भावनेने या मुलांना मदत करणारा हबाक संवेदवनलशील फोटोग्राफर म्हणून जगभर प्रसिध्द झाला आहे.