पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७० वा वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांबरोबरच स्टाइल स्टेटमेंसाठी ओळखले जातात. त्यांच्या कपड्यांपासून ते गॉगलपर्यंत अनेक गोष्टींची वेळोवेळी चर्चा होताना दिसतात. तरुणाईमध्येही मोदींची प्रचंड क्रेझ आहे. त्यांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर याची झळक पहायला मिळते. मोदींच्या कपड्यांबरोबरच त्यांची आणखीन एक स्टाइल चर्चेत असते ती म्हणजे ते मनगटावर घड्याळ उलटं घालतात. म्हणजे सामान्यपणे डायल वर ठेऊन घडळ्यात घातले जाते मात्र मोदी उलट बाजूला डायल ठेऊन घड्याळ घातलतात. यामागे एक खास कारण असून त्याचा खुलासा मोदींनी केला होता.

मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षय कुमारने मागील वर्षी एप्रिल महिन्यात घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये केलेला. या मुलाखतीमध्ये राजकीय प्रश्नां बगल देत मोदींच्या खासगी आयुष्यासंदर्भातील वेगळा पैलू लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या. या मुलाखतीच्या माध्यमातून मोदींच्या खासगी आयुष्यातील बरीचशी माहिती पहिल्यांदाच समोर आली. याच मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे गुपित सांगितले होते.

अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान त्यांच्या घड्याळ घालण्याच्या सवयीसंदर्भात प्रश्न विचारला. ‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, असा सवाल अक्षयने मोदींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी मी अशाप्रकारे घड्याळ घालण्यामागे एक विशेष कारण असल्याचे सांगितले. ‘मी अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मी लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहतो,’ असं स्पष्टीकरण मोदींनी दिले.

या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिलेली. यामध्ये अगदी त्यांचे फोटो वापरुन तयार होणारे मीम्स, विरोधी पक्षातील नेत्यांबरोबरची मैत्री, लहानपणीच्या आठवणी अशा अनेक विषयांवर मोदींनी मोकळेपणे गप्पा मारल्या होत्या.