उत्तर प्रदेशातील बदाऊन शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका ३० वर्षीय व्यक्तीवर एका उंदराच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीनं उंदराच्या शेपटीला वीट बांधून त्याला नाल्यात बुडवून मारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३० पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे.
मनोज कुमार असं गुन्हा दाखल झालेल्य ३० वर्षीय आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती, पण नंतर त्याला स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्राणी हक्क कार्यकर्ते विकेंद्र शर्मा यांनी आरोपी मनोज कुमार याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार विकेंद्र शर्मा यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला होता. तसेच त्यांनी संबंधित उंदराचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्या उंदराचा मृत्यू झाला होता. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बदाऊन शहाचे सर्कल ऑफिसर (सीओ) आलोक मिश्रा यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपपत्रात विविध पुरावे जोडले आहेत. यामध्ये उंदराचा शवविच्छेदन अहवाल, प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले व्हिडीओ तसेच संबंधित विभागातील तज्ज्ञांची मते यांसह ३० पानी आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. आरोपी मनोज कुमार याच्यावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ११ (१) (प्राण्यांबरोबर क्रूरता करणे) आणि कलम ४२९ (प्राण्यांना मारणे किंवा अपंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी उंदराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (आयव्हीआरआय) पाठवला होता. फुफ्फुसांना सूज आल्याने उंदराचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच उंदराच्या यकृताला संसर्ग झाल्याचं आरोपपत्रात लिहिण्यात आलं आहे. याशिवाय गुदमरल्यामुळेच उंदराचा मृत्यू झाल्याचेही सूक्ष्म तपासणीत स्पष्ट झाले.