नोटाबंदीच्या निर्णयाला आता दीड महिन्यांहूनही अधिक काळ लोटला आहे. या निर्णयाचा सामान्य नागरिकांना फटका बसलाच पण लग्नघराला देखील याचा मोठा फटका बसला. अनेकांनी तर हा गोंधळ जोपर्यंत शमत नाही तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच छत्तीसगढच्या एका महिला पोलीस कर्मचा-याने फक्त १००० रुपयांत आपला विवाह सोहळा पार पाडला आहे. येथील महिला पोलीस कर्मचारी गीता बिहारी या नर्सिंगचे विद्यार्थी अमित धुर्व याच्यासोबत विवाह बंधनात अडकली आहे. नोटाबंदीनंतर धुमधडाक्यात लग्न करण्यासाठी पैसे नसल्याने या जोडप्याने फक्त १ हजार रुपये खर्च करुन आपला विवाह सोहळा पार पाडला.

वाचा : ‘या’ गावाने देशाला दिले सर्वाधिक आयपीएस, आयएएस अधिकारी

दंतेवाडा येथे राहणा-या गीता बिहारी या महिला पोलीस कर्मचा-याने अगदी साध्या पद्धतीत आपला विवाह पार पाडला. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा लादल्याने आपण काहीच करू शकत नव्हतो म्हणून अत्यंत साधेपणाने आपण विवाह केल्याचे या जोडप्याने ‘आजतक’ या वृत्तवाहिनीला सांगितले. त्यांनी अल्पोपहारासाठी ५०० रुपये, हारासाठी २०० रुपये, ५१ रुपये प्रसादासाठी आणि १५१ रुपये दक्षिणा एवढाच खर्च आपल्या विवाह सोहळ्यावर केला. तसेच लग्नाला येणा-या कोणतीही भेटवस्तू न आणण्याचे आवाहान त्यांनी केले. याच महिन्यात कर्नाटकमधल्या विजयवाडा येथील आयएएस जोडप्याने फक्त ५०० रुपयांमध्ये आपला विवाह सोहळा ओटोपला होता. अनिष विशिष्ठ हे आयएएस ऑफिसर असून त्यांचा सलोनी सैधाना हिच्याशी २८ नोव्हेंबरला विवाह झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांना लग्नावर फार उधळपट्टी करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले. यासाठी कोर्टाची फक्त पाचशे रुपये फी भरून त्यांनी आपला विवाह सोहळा पार पाडला. त्यांच्याजवळचे काही नातेवाईक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. इतकेच नाही तर विवाह सोहळा झाल्यानंतर ते दोन दिवसांत आपल्या कार्यालयात दाखल देखील झाले.

वाचा : म्हणून येथे ‘त्या’ बुलेटची पूजा केली जाते

गुजरातमधल्या सुरत येथे राहणा-या दक्षा आणि भरत परमार यांनी देखील फक्त पाचशे रुपयात आपला विवाह सोहळा पार पाडला होता. त्यांच्या लग्नाची तारिख काही महिन्यांपूर्वीच ठरली होती. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्यांना मोठा विवाह सोहळा करता आला नाही. बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा होती. तसेच अनेक बँकांमध्ये पुरेशी रोकड उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांनी गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने आपला विवाह सोहळा साजरा केला. आपल्या मोजक्याच पाहुण्यांना बोलवत फक्त चहा आणि पाण्याचे वाटप करत त्यांचा विवाह सोहळा पार पडला होता.