भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही विविध कारणांमुळे कायम चर्चेत असते. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतरही ती भारताचे प्रतिनिधित्व करते. या मुद्द्यावरून सानियावर अनेकदा टीका करण्यात आली, पण तिने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून आपली पॉवरफुल प्रतिमा जपली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या अशाच पॉवरफुल रूपाचे पुन्हा एकदा दर्शन झाले होते. सानियाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तिने एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात रॅकेट घेत आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असल्याचा संदेश दिला होता.

सानिया आपल्या घरातील आणि मैदानावरील जबाबादाऱ्या नीट पार पाडते हे वेळोवेळी तिने दाखवून दिले आहेच. त्याचंच आणखी एक उदाहरण तिने नव्या व्हिडीओतून दिलं. करोनामुळे साऱ्या स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे ती घरातच आहे. अशा वेळी ती आपला मुलगा इझान याच्यासोबत छान वेळ घालवत आहे. सानियाने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात ती मुलाला वेगवेगळे प्रश्न विचारते आहे. त्यात तिने एक प्रश्न विचारला की बाबा काय करतात? त्यावर, बाबा सिक्स मारतात, असं उत्तर इझानने दिलं. त्यानंतर सानियाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये इझान बाबांना झुकतं माप देत असल्याचेही मिस्किलपणे म्हटलं.

पाहा मजा-मस्ती करतानाचा व्हिडीओ –

काही दिवसांपूर्वी, सानिया मिर्झा दुबईत सुरू असलेल्या फेड कप टेनिस स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत होती. या स्पर्धेत ८ मार्चला तिचा सामना इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याशी झाला. त्या सामन्याआधी एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात रॅकेट घेत चालत असल्याचा फोटो काढण्यात आला होता. या फोटोमध्ये तिने एका हातात टेनिसची रॅकेट घेतली आहे, तर दुसऱ्या हातात म्हणजेच कडेवर तिने मुलगा इझान याला घेतले होते. ‘माझं संपूर्ण आयुष्य एका फोटोत’, असे त्या फोटोला तिने कॅप्शन दिले होते.