Boy try to sell gold ring for buying maggi: लहान मुलांच्या निरागसतेची कल्पना मोठ्यांना कधीच येऊ शकत नाही. कारण ती कधी काय कोणत्या विचाराने आणि हेतूने करतील याचा थांगपत्ता लागणं अवघडच. असाच एक निरागस चिमुकला चक्क त्याच्या आवडीच्या खाण्यासाठी म्हणून थेट सोन्याची अंगठी विकायला सोनाराकडे गेला. यावरून या मुलाचे फास्ट फूडसाठीची क्रेझ दिसून आली. कानपूरमध्ये हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. तर झालं असं की, कानपूरमधील हा लहान मुलगा केवळ एका मॅगीसाठी म्हणून घरातली सोन्याची अंगठी विकायला घेऊन घराबाहेर पडला. केवळ मॅगीसाठी एवढा अट्टाहास केल्याने यावरून नूडल्ससाठी मुलं काय काय विचार करू शकतात हे अधोरेखित झालं.

बहिणीच्या साखरपुड्याची अंगठी होती ती…

मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा अंगठी विकण्यासाठी म्हणून एका सोनाराच्या दुकानात गेला. दुकानदार पुष्पेंद्र जैसवाल यांनी मात्र त्या मुलाची निरागसता टिपली आणि त्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. तितक्याच निरागसतेने या मुलाने उत्तर दिले की त्याला मॅगी विकत घेण्यासाठी म्हणून पैसे हवे आहेत आणि म्हणून त्याला अंगठी विकायची आहे.

काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच दुकानदाराने या मुलाच्या आईला त्वरित या गोष्टीची माहिती दिली आणि दुकानात बोलावून घेतले. दुकानदाराने मुलाच्या आईला त्याने आणलेली अंगठी दाखवली आणि त्याची आई आश्चर्यचकित झाली. ती अंगठी तिच्या मुलीची म्हणजेच त्या मुलाच्या बहिणीच्या साखरपुड्याची असल्याचे सांगितले. तिला चिंता लागली की आपल्या मुलाने अंगठी विकून झाली. मात्र, त्याने तसं काही न केल्याचं दुकानदाराने सांगितलं.

त्या दुकानदाराने आपण असे कोणत्याही लहान मुलाकडून कुठल्याही कागदपत्रांशिवाय दागिने स्वीकारत नाही असे सांगितले. त्यानंतर ती अंगठी मुलाच्या आईकडे सुपूर्त केली. यावेळी दुकानदाराचे प्रसंगावधान आणि जागरूकता प्रामुख्याने दिसून आली. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.