बंगळुरूमधल्या विनयभंगाच्या घटनांनी देशाला हादरून सोडले. ३१ डिसेंबरला बंगळुरू शहराच्या एम.जी रोडवर नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या अनेक महिलांचे विनयभंग करण्यात आले. भर रस्त्यात महिलांवर अश्लिल शेरेबाजी करण्यापासून त्यांच्या छेड काढण्याच्या अनेक घटना घडल्या. दुर्दैव म्हणजे या भागात सुरक्षेसाठी हजारो पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असताना हा संपूर्ण प्रकार घडला. सोशल मीडियावर अनेक महिलांनी याचे धक्कादायक अनुभव शेअर केले. संपूर्ण देशभर हे प्रकरण गाजत आहे. यासंपूर्ण प्रकरणावर तरूणांनां काय वाटते हे जाणून घेण्यासाठी दोन तरूणांनी स्टिंग ऑपरेशन केले. पण शरमेची बाब म्हणजे हे दोन्ही तरूणांनी ज्या तरुणांनी संवाद साधला त्यांनी महिलांना दोषी ठरवत त्यांच्यासोबत झाले ते योग्य झाले अशा धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या.

वाचा : विनयभंग करणाऱ्या तरुणाला बंगळुरूच्या मुलीने शिकवला धडा

३१ डिसेंबरला बंगळुरूच्या उच्चभ्रु वस्ती असलेल्या एम.जी रोडवर पोलिसांच्या डोळ्यादेखत अनेक महिलांचे विनभंय करण्यात आले. इतकेच नाही तर रात्री २.३० वाजता घरी परतत असताना कम्मनहल्ली रोडवर एका युवतीचा दोन तरुणांनी विनयभंग केला होता. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने देशभरात खळबळ उडाली होती. या संपूर्ण विनयभंगाच्या प्रकरणावर देशातील तरूणांना काय वाटते हि मते जाणून घेण्याचा प्रयत्न ‘Prank Baaz – Bachke Rehna re Baba’ ने केला. यातल्या दोघा तरूणांनी मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी रस्ते, गार्डन, टप-यांवर जमलेल्या अनेक तरूणांशी त्यांनी संवाद साधला. पण या तरूणांनी दिलेल्या प्रतिक्रिया शरमेने मान घालायला लावणा-याच होत्या. यातल्या अनेकांनी तर जे झाले ते योग्यच झाले अशा धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या.

तर काहींनी या सगळ्यात मुलींचे कपडे जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. कळस म्हणजे तोकडे कपडे घालणा-या मुलींना अशाच प्रकारे शिक्षा दिली पाहिजे अशीही मते अनेकांनी व्यक्त केली. तालिबान्यांसारखी महिलांना वागणूक दिली पाहिजे इतकेही बोलायला मागेपुढे पाहिले नाही. प्रँक बाझने सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामुळे अजूनही भारतीयांच्या मानसिकतेत सुधारणा होत नसल्याची खंत आता सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

viral video : बंदुकीतून सुटलेली गोळी तोंडात पकडण्याचा स्टंट जादुगाराच्या जीवावर बेतला

बंगळुरूमधल्या विनयभंगाच्य घटनेने देशाची मान पुन्हा एकदा खाली गेली. अनेक राजकारण्यांनी यावर वादग्रस्त टीका करत वातावरण आणखी पेटवले. समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनीही वाद ओढवून घेतला होता. ‘आताच्या मॉर्डन जमान्यात महिला जितकी नग्न दिसते, तितकीच ती फॅशनेबल आहे, असे म्हटले जाते. माझी बहिण किंवा मुलगी सूर्य मावळल्यानंतर गैरपुरुषासोबत ३१ डिसेंबरला बाहेर पडते. त्यावेळी तिच्यासोबत भाऊ किंवा पती नसतो. हे बरोबर नाही’ असे अबु आझमी म्हणाले. ‘पेट्रोलच्या संपर्कात आग आली तर आग भडकेलच, साखर पडेल तिथे मुंग्या येणारच’, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले. या विधानानंतर अनेक लोक नाराजी व्यक्त करतील, पण हे वास्तव आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृतीचे आचरण करा. आपल्या कुटुंबीयांसोबतच घराबाहेर पडा, असा सल्लाही त्यांनी महिलांना दिला होता.